लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत नुकताच गणेशोत्सव पार पडला; मात्र शहर, उपनगरावरील कोरोना संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ पहायला मिळाली. त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली. मात्र, यंदा ही रुग्णसंख्या वाढू नये आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतरच्या १५ दिवसांवर आता आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे.
सध्या मुंबईसह राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. यातच गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारे १५ दिवस धोक्याचे असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईबाहेर गेलेले चाकरमाने आता परतत आहेत. त्यामुळे मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. मुंबईत २६६ ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४१९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे.