Join us

प्रशासन धारेवर

By admin | Updated: April 1, 2015 00:10 IST

आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला वारंवार लागणा-या आगीचे पडसाद मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले.

कल्याण: आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला वारंवार लागणा-या आगीचे पडसाद मंगळवारच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. आगीमुळे निर्माण होणारे धुराचे लोट, परिणामी नागरीकांना होणारा त्रास यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावर निविदाप्रक्रियेचे काम पूर्ण झाले असून तातडीने कार्यादेश देण्यात येतील असे उपायुक्त डॉ सुनील लहाने यांनी स्पष्ट केले.केडीएमसी क्षेत्रात प्रतिदिन जमा होणारा ५५० टन कचरा आधारवाडी डंपिंगला टाकला जातो. या डंपिंगची क्षमता संपुष्टात आली आहे परंतू पर्यायी व्यवस्था न झाल्याने आजच्याघडीला आधारवाडी येथेच कचरा डंप केला जात आहे. दरम्यान साचणा-या कच-यातून मिथेन वायूची निर्मिती होऊन आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. डंपिंगला लागणा-या आगीमुळे पसरणा-या धुराचा त्रास आजूबाजूच्या परिसरात राहणा-या रहिवाशांबरोबर तेथे असणा-या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत आहे. यासंदर्भात रहिवाशांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चाही काढला होता. दरम्यान या आगीप्रकरणी मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत अधिका-यांना जाब विचारण्यात आला. सदस्य मनोज घरत आणि श्रेयस समेळ यांनी प्रशासनाने काय कार्यवाही केली असा सवाल केला. दरवर्षी उन्हाळयात या घटना घडत असताना याकामीच्या निविदाप्रक्रियेस उशीर का केला याबाबतही विचारणा केली. गेले दिड महिने नागरीकांच्या जिविताशी खेळ सुरू आहे परंतु मोठया खर्चाची निविदा नसल्याने प्रशासन गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप सदस्य वामन म्हात्रे यांनी केला. मुंबईच्या डंपिंग ग्राऊंडवर मिथेन वायू विलग करण्यासाठी ज्याप्रमाणे टयुबवेल लावण्यात आले आहेत त्याची अंमलबजावणी आधारवाडी येथेही करावी अशी सूचना सभापती दीपेश म्हात्रे यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)