Join us

आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

By admin | Updated: April 5, 2015 01:06 IST

पडघे येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ठाकरेंसमोर समस्यांचा पाढा वाचला.

पनवेल : पडघे येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ठाकरेंसमोर समस्यांचा पाढा वाचला. वसतिगृहाचे भाडे थकल्याने जागेच्या मालकाकडून जागा खाली करण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी ‘कपडे काढो’ आंदोलन करून शासनाचा निषेध केला होता. या वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासंदर्भात ४ डिसेंबर २०१४ पासून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलनही केले. गुरुवारी विद्यार्थ्यांच्या कपडे काढो आंदोलनाने प्रशासन, लोकप्रतिनिधी जागे झाल्याने शुक्रवारी खांदा कॉलनीतील वसतिगृहात काही युवा सेनेचे पदाधिकारी आले व काही विद्यार्थ्यांना घेऊन थेट मातोश्रीवर गेले. आदित्य ठाकरेंच्या भेटीदरम्यान आदित्य यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून संबंधित विषय विधानसभेत लावून धरण्यास सांगितले. आदित्य ठाकरेंनीही या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. या भेटीदरम्यान युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंसमवेत युवा सेना कॉलेज विभागाचे प्रमुख वरुण सरदेसाई, युवा सेनेचे रायगड जिल्हा चिटणीस रुपेश पाटील, आदिवासी विद्यार्थी प्रतिनिधी सुनील तोटावाड, दामू मवळे, सुमीत गिरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)