Join us  

आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अंतर्गत गुण आणि अकरावी प्रवेशावर केली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 7:25 AM

निकालात झालेल्या घसरणीचा फटका महापालिका शाळांनाही बसला असून त्यामुळे या शाळांतील प्रवेशांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका यंदाच्या निकालाला बसला असून यामुळे अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. राज्य मंडळाचे अनेक विद्यार्थी नापासही झाले आहेत. यामुळे हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची भीतीही या भेटी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखविली. 

दरम्यान निकालात झालेल्या घसरणीचा फटका महापालिका शाळांनाही बसला असून त्यामुळे या शाळांतील प्रवेशांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अंतर्गत गुण आवश्यक असल्याचे मत ठाकरे यांनी मांडले.  या पार्शवभूमीवर या नवीन शैक्षणिक २०१९ -२० वर्षी भाषा आणि समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षा सुरु करावीत आणि सध्या सुरु होणाऱ्या ११वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तुकड्या वाढवून देण्यात याव्यात अश्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आपण लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिले.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीस