Join us  

गाणं वाजू द्या.. 'थर्टी फर्स्ट'ला शहरं रात्रभर सुरू ठेवा; आदित्य ठाकरे उतरले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 11:16 AM

थर्टी फर्स्ट साजरा करताना सर्वसामान्यांसाठी वेळेचे बंधन असू नये, यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.   

ठळक मुद्दे31 डिसेंबरला शहरं रात्रभर खुली असावीत - आदित्य ठाकरेआदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र31 डिसेंबरला आनंदोत्सव साजरा करण्यासाठीची सर्व ठिकाणं रात्रभर कायदेशीररित्या खुली ठेवावीत - आदित्य ठाकरे

मुंबई - काही दिवसांतच आपण वर्ष 2018ला बाय-बाय करुन नवीन वर्ष 2019चं थाटामाटात स्वागत करणार आहोत. प्रत्येक जण आपापल्या स्टाईलनं न्यू ईअर सेलिब्रेशन करण्यासाठी तयारीला लागला आहे. थर्टी फर्स्ट जल्लोष साजरा करताना सर्वसामान्यांसाठी वेळेचे बंधन असू नये, यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.   

सर्वसामान्य नागरिकांना नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी 31 डिसेंबर रोजी मनोरंजन आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठीची सर्व ठिकाणं रात्रभर कायदेशीररित्या खुली ठेवण्यात यावीत, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. 

''मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे यांसारख्या अनेक शहरवासीयांना नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्याची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर कायदेशीर मनोरंजनाची आणि आनंदोत्सव साजरा करण्याची सर्व ठिकाणं विशेषतः अनिवासी भागातील ठिकाणे रात्रभर खुली ठेवावीत'', असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे. 

दरम्यान, मुंबई आणि अन्य शहरं 24 तास खुली राहावीत, यासंदर्भातील प्रस्ताव 2017मध्ये विधानसभेत मंजूर करण्यात आला. मात्र संबंधित प्रस्ताव गृह खात्याकडे काही महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रस्तावाचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची मागणी मुख्यमंत्री फडणवीस मान्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.  

 

(३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल)

दरम्यान,  नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत चार आणि विरार ते चर्चगेटपर्यंत चार विशेष लोकल चालविण्यात येतील. १२ डब्यांच्या या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. तर, मध्य रेल्वेवर दोन तसेच हार्बर मार्गावर दोन विशेष लोकल चालविण्यात येतील.

डाऊन मार्गावरील विशेष लोकलमध्ये पहिली लोकल ३१ डिसेंबरच्या रात्री चर्चगेट स्थानकातून रात्री १ वाजून १५ मिनिटांची असून, विरार स्थानकात रात्री २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. दुसरी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री २ वाजता सुटेल आणि विरार स्थानकात रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तिसरी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री २ वाजून ३० मिनिटांची असून विरार स्थानकात पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तर, चौथी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री ३ वाजून २५ मिनिटांची असून विरार स्थानकात पहाटे ५ वाजून ०५ मिनिटांनी पोहोचेल.

अप मार्गावरील विशेष लोकलमध्ये पहिली लोकल विरार स्थानकातून रात्री १२ वाजून १५ मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात रात्री १ वाजून ४७ मिनिटांनी पोहोचेल. दुसरी लोकल विरार स्थानकातून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात रात्री २ वाजून १७ मिनिटांनी पोहोचेल. तिसरी लोकल विरार स्थानकातून रात्री १ वाजून ४० मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात रात्री ३ वाजून १२ मिनिटांनी पोहोचेल. तर, चौथी लोकल विरार स्थानकातून रात्री ३ वाजून ०५ मिनिटांची असून चर्चगेट स्थानकात पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी पोहोचेल.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआदित्य ठाकरे