Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर स्कायवॉक प्रकरणी आता परत नवीन समिती नेमा - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे बोरीवली पूर्व स्टेशन ते नॅशनल पार्क असा नवा स्कायवॉक बांधण्याचे पालिकेने प्रस्तावित केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे बोरीवली पूर्व स्टेशन ते नॅशनल पार्क असा नवा स्कायवॉक बांधण्याचे पालिकेने प्रस्तावित केले असताना दहिसर पश्चिम येथील गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला स्कायवॉक तोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा स्कायवॉक बांधण्यात आला होता. सदर स्कायवॉक धोकादायक झाला असून याचे भाग खाली पडून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा धोकादायक स्कायवॉक तोडण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र अजूनही पालिका प्रशासनाने यावर ठोस कारवाई केलेली नाही. ‘लोकमतने’सुद्धा यासंदर्भात वृत्त दिले होते.

युवासेना प्रमुख आणि उपनगर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत परिमंडळ ७ मधील शिवसेना नगरसेवकांची पायाभूत सुविधांच्या कामकाजाचा संदर्भात बैठक झाली. हा स्कायवॉक पुन्हा दुरुस्त करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशा प्रकारचा अहवाल महापालिकेतर्फे सादर करण्यात आला होता. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक या दोहोंचा स्कायवॉकला विरोध आहे. त्यामुळे स्कायवॉक पुनर्बांधणीचा अहवाल पुन्हा तपासण्यात यावा आणि आता तो पाडून टाकण्यात यावा, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री आदित्य ठाकरे हे स्कायवॉकच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत असून नवीन समिती स्थापन करून नवीन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

-------------------------