लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष आणि पक्षाचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
आदित्य शिरोडकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जात. राज ठाकरे यांचे एकेकाळचे व्यावसायिक भागीदार असलेल्या राजन शिरोडकर यांचे पुत्र असलेल्या आदित्य यांना मनसेच्या स्थापनेपासून महत्त्वाची पदे मिळाली होती. मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. तसेच, दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून ते मनसेचे उमेदवारही होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षकार्यात फारसे सक्रिय नव्हते.
मनसेची स्थापना आणि त्यानंतरच्या पक्षाच्या वाटचालीत आदित्य यांचे वडील राजन शिरोडकर यांचा सक्रिय सहभाग होता. पडद्यामागे राहून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे मानले जात होते. शिवाय, राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची अनेक वर्षांपासूनची घनिष्ठ मैत्रीही होती. त्यामुळे आदित्य यांचा शिवसेना प्रवेश मनसेपेक्षा स्वतः राज ठाकरे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. अगदी मागच्या वर्षी ईडीने कोहिनूर प्रकरणात राज ठाकरे यांच्यासोबत राजन शिरोडकर यांचीही चौकशी केली होती. तेव्हापासूनच शिरोडकर पक्षात निष्क्रिय झाल्याचे बोलले जात आहे.