Join us  

आदित्य पांचोलीला कोर्टाचा ३ ऑगस्टपर्यंत अंतरिम दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 2:50 AM

बलात्कार प्रकरण : अटक न करण्याचा आदेश

मुंबई: बलात्कार प्रकरणी बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याला दिंडोशी सत्र न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचा आदेश पोलिसांना दिले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आदित्य पांचोलीविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराचा व ब्लॅकमेलिंगची तक्रार नोंदविली. पोलिसांनी पांचोलीवर भारतीय दंडसंहिता ३७६ (बलात्कार), ३२८ (विष देऊन दुखापत करण्याचा प्रयत्न करणे), ३८४ (खंडणी मागणे) अन्य काही कलमांखाली गुन्हा नोंदविला.

आपल्याला अटक होईल, या भीतीने पांचोलीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होती. सरकारी वकिलांनी तपासासंबंधीची कागदपत्रे चाचपण्यासाठी मुदतवाढ मागितल्याने, न्यायालयाने आदित्य पांचोलीला अंतरिम दिलासा दिला. ३ ऑगस्टपर्यंत त्याला अटक न करण्याचा आदेश पोलिसांना दिला.

गेल्या वर्षी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आदित्य पांचोलीबरोबर करिअरच्या सुरुवातीस आपले प्रेमप्रकरण सुरू होते, अशी ग्वाही दिली. मात्र, आदित्य पांचोलीने आपल्यावर जबरदस्ती केली व आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही यावेळी सांगितले. याबाबत आदित्यची पत्नी झरीना वहाब हिच्याकडे तक्रार केली. मात्र, तिने मदत करण्यास नकार दिला, असेही तिने मुलाखतीत म्हटले आहे. पांचोलीने २०१४ मध्ये आपले खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :आदित्य पांचोलीन्यायालय