Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्त शिंदे अखेर पालिकेच्या सेवेतून मुक्त

By जयंत होवाळ | Updated: July 31, 2024 19:13 IST

Mumbai: मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना अखेर राज्य सरकारने पालिकेच्या सेवेतून मुक्त केले आहे.शिंदे हे भारतीय  महसूल सेवेतील सनदी अधिकारी असून त्यांना पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते.

- जयंत होवाळ मुंबई - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना अखेर राज्य सरकारने पालिकेच्या सेवेतून मुक्त केले आहे.शिंदे हे भारतीय  महसूल सेवेतील सनदी अधिकारी असून त्यांना पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. शिंदे यांच्याकडे पश्चिम उपनगराचा कार्यभार होता.त्याचबरोबर पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण शिक्षण विभाग व रुग्णालये ,मध्यवर्ती खरेदी केंद्राचे कामकाज,डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया आदि विभागांचाही कार्यभार होता. मध्यंतरी भाजपचे मोहित कंबोज यांनी शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना मूळ सेवेत परत पाठवा,अशी मागणी केली होती. कार्यकाळ संपून गेला तरी ते अजून पदावर कसे,असा सवाल मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही केला होता.शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात.

मुंबई महानगरपालिकेत २ जून २०२३ रोजी दाखल झालेले डॉ. सुधाकर शिंदे हे अंतर्गत महसूल सेवेतील अधिकारी असून २४ नोव्हेंबर २०१५ पासून ते महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत. त्यांचा आठ वर्षांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संपला आहे. हा कार्यकाळ संपल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, मनुष्यबळ विकास संचालनालय, वित्त मंत्रालय/महसूल विभागाने कळवले आहे की मंत्रिमंडळ नियुक्ती मंडळाने त्यांचा प्रतिनियुक्ती वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शासनाकडून त्यांना तातडीने मुक्त करण्यात येत आहे. परिणामी शिंदे यांनी आपला कार्यभार महापालिका आयुक्तांकडे ३१ जुलै रोजी सोपवून केडरमध्ये  सहभागी व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.  शिंदे यांच्याकडील खात्याचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई