Join us
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारांतर्गत नद्या जोडाव्यात

By admin | Updated: June 27, 2015 23:07 IST

तालुक्यातील मुख्य तीन नद्यांपैकी दोन नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे या परिसरातील गावे-वाड्यांना पाण्याची टंचाई भासते.

कर्जत : तालुक्यातील मुख्य तीन नद्यांपैकी दोन नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे या परिसरातील गावे-वाड्यांना पाण्याची टंचाई भासते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत त्या दोन्ही नद्या बारमाही वाहत्या होण्यासाठी योजना राबवायला हवी, अशी मागणी आता पुन्हा कर्जत तालुक्यात जोर धरत आहे.जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारण आणि मृदू संधारणाची कामे जामरुख, मांडवणे आणि ओलमण या गावांमध्ये पाटबंधारे, कृषी, वन, महसूल या खात्यांच्या सहयोगातून सुरू आहेत. मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे, लूज बोर्डर आणि जलखंदक यांचा फायदा येत्या उन्हाळ्यात या भागाला होणार आहे. कर्जत तालुक्यात बऱ्याच भागात पाणीटंचाईचे संकट आहे. कारण त्या भागातून वाहणाऱ्या दोन नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. भीमाशंकर अभयारण्य परिसरात उगम पावणारी पोसरी नदी ही नांदगाववरून कळंब अशी पुढे पोशिर, मानिवलीवरून उल्हासनदीला जाऊन मिळते. तर जामरुख परिसरात उगम पावणारी चिल्लारनदी आंबीवलीवरून सुगवे, पिंपळोलीवरून उल्हासनदीला जाऊन मिळते. या दोन्ही नद्यांच्या आसपास शंभरहून अधिक गावे आणि वाड्या आहेत, त्यांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे संकट असते. यावर्षी कर्जत तालुक्यातील ७४ गावे आणि वाड्या या पाणीटंचाईग्रस्त होत्या. त्यामुळे या दोन्ही नद्या बारमाही वाहत्या व्हाव्या यासाठी एक योजना सरकारने राबवावी, यासाठी अनेक नेते सातत्याने पाठपुरावा करीत होते.चिल्लारनदी आणि कर्जतचा पूर्वभाग हिरवागार करणारा राजनाला कालवा यामध्ये एक डोंगर आहे. त्या डोंगराला टाटा कॅम्प परिसरात सावळे हेदवली येथे बोगदा खोदल्यास कालव्याचे पाणी थेट मालेगाव येथून चिल्लारनदीमध्ये येऊ शकत आणि ही नदी बारमाही वाहती होऊ शकते. त्यामुळे त्याचा थेट पिंपळोली गावापर्यंतच्या लोकांना फायदा होऊ शकतो.