Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेईंग गेस्ट म्हणून आलेल्या अभिनेत्री निघाल्या चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:05 IST

दाेघींना अटक; आरे पोलिसांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गुन्हे मालिका, वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या ...

दाेघींना अटक; आरे पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गुन्हे मालिका, वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींच्या हातातले काम गेले. गाठीशी असलेले पैसेही संपले हाेते. अखेर मित्राच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या या दाेघींनी तेथेच चोरी केल्याचा प्रकार समोर आला. त्यांची चोरी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरे पोलिसांनी दोघींंना अटक केली आहे.

सुरभी श्रीवास्तव ( वय २५) आणि मोसीना शेख (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रींची नाव आहेत. दोघीही मुंबईमध्ये स्ट्रगलर म्हणून आल्या. त्यांना बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमवायचे आहे. ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’सारख्या मालिका तसेच काही वेब सीरिजमध्येही त्यांनी काम केले आहे. १८ मे रोजी आरेमधील रॉयल पाम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मित्राकडे सुरभी आणि माेसीना पेइंग गेस्ट म्हणून गेल्या. तेथे आणखी एकजण राहण्यास होता. त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेले तीन लाख २८ हजार रुपये घेऊन या दोघी पसार झाल्या.

तक्रारदाराने आरे पोलीस ठाणे गाठून दोघींवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दोघी हातात एक बॅग घेऊन जाताना दिसल्या. त्यानुसार त्यांचा शोध घेत नुकतेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार दोघींना अटक करण्यात आल्याची माहिती आरे पोलिसांनी दिली.

................................................