Join us
Daily Top 2Weekly Top 5

६.५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा अभिनेता विशालचा सेन्सॅार बोर्डावर आरोप

By संजय घावरे | Updated: September 29, 2023 14:47 IST

इंडियन फिल्म अँड टिव्ही डायरेक्टर्स असोसिएशन आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनतर्फे सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई - 'मार्क अँटनी' या तमिळ चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला सेन्सॅार सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मुंबईतील केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी)साडे सहा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप दाक्षिणात्य अभिनेता विशालने केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल करून योग्य कारवाई करण्याची मागणी इंडियन फिल्म अँड टिव्ही डायरेक्टर्स असोसिएशन आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने केली असून, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विशाल सध्या 'मार्क अँटनी' या तमिळ चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशालने नुकताच एक व्हिडिओ रिलीज केला. यामध्ये त्याने 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी सेन्सॅार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना ६.५ लाख रुपयांची लाज द्यावी लागल्याचा खुलासा केला आहे. यू/ए प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सीबीएफसी अधिकाऱ्यांना दिलेल्या रकमेचे पुरावे म्हणून बँकेच्या व्यवहाराच्या पावत्याही ट्विटद्वारे शेअर केल्याचेही विशालने सांगितले आहे. व्हिडिओमध्ये विशाल म्हणाला की, रुपेरी पडद्यावर भ्रष्टाचार दाखवणे ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात हे पचत नाही. विशेषत: सरकारी कार्यालये आणि सीबीएफसी मुंबई कार्यालयात ते खूपच वाईट आहे. 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मला ६.५ लाख रुपये मोजावे लागले. स्क्रीनिंगसाठी तीन लाख रुपये आणि प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाख रुपये असा दोनदा व्यवहार झाला. माझ्या कारकिर्दीत कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण बरेच काही पणाला लागले होते. माझ्यासाठी नव्हे तर भविष्यातील निर्मात्यांसाठी हे प्रकरण मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहे. कष्टाने कमावलेला पैसा भ्रष्टाचाराचा बळी ठरला असे अजिबात होऊ देणार नाही. नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल अशी आशाही विशालने व्यक्त केली.

विशालच्या या व्हिडिओवर तात्काळ अॅक्शन घेत इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. इंडियन फिल्म अँड टिव्ही डायरेक्टर्स असोसिएशनने हे प्रकरण सीबीएफसीच्या नावाला काळीमा फासणारे असल्याने संबंधितांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.