Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता सोनू सूदला उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

अभिनेता सोनू सूदला उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासाअभिनेता सोनू सूदला उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासाजुहू इमारत प्रकरणलोकमत न्यूज ...

अभिनेता सोनू सूदला उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

अभिनेता सोनू सूदला उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

जुहू इमारत प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुहूमधील इमारतीच्या बांधकामात बदल करणे व रहिवासी इमारतीचा वापर हॉटेल म्हणून केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अभिनेता सोनू सूदला उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. दिवाणी न्यायालयाने कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण १३ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सोमवारी दिले.

जुहूमधील ए.बी. नायर मार्गावर साेनू सूदच्या मालकीची ‘शक्तीसागर’ नावाची सहा मजली निवासी इमारत आहे. सूदने या इमारतीत बदल करून तिचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. त्यासाठी महापालिकेची आवश्यक परवानगी घेतली नाही, असे पाहणीत आढळल्यानंतर पालिकेने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबरला त्याला एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली. त्याविरोधात सूदने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून कठोर कारवाई होऊ नये म्हणून तातडीचा अर्ज केला. दिवाणी न्यायालयाने डिसेंबरमध्ये ताे फेटाळत या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी त्याला तीन आठवड्यांची मुदत दिली. त्याचा अर्ज फेटाळला जाताच पालिकेने जुहू पोलिसांत ४ जानेवारीला लेखी तक्रार दिली.

सूदने तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत पालिकेची नोटीस रद्द करावी आणि या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत पालिकेला कठोर कारवाई करण्यास मनाई करावी, अशी विनंती केली. न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली.

सूद सहा मजली इमारतीमध्ये २४ रूम्सचे विनापरवाना हॉटेल चालवत आहे. २०१८ व २०१९ मध्ये कारवाई केली होती. तरीही हॉटेल व्यवसाय सुरूच आहे, असे साखरे यांनी सांगितले. तर हॉटेल व्यवसाय करत नसून हे एक निवासी हॉटेल आहे. येथे फ्लॅट भाड्याने देण्यात येतात, असे सूदतर्फे ॲड. अमोघ सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब करत सूदला १३ जानेवारीपर्यंत अंतरिम दिलासा दिला.