Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावरील अभिनेत्याला लुटले

By admin | Updated: May 2, 2017 03:55 IST

छोट्या पडद्यावरील सुमित अरोरा या अभिनेत्याला लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर

 मुंबई : छोट्या पडद्यावरील सुमित अरोरा या अभिनेत्याला लुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत, त्यांचा शोध सुरू केला आहे. फिर्यादी एका खासगी वृत्तवाहिनीवरील विनोदी मालिकेत काम करतो. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरे कॉलनी परिसरातून चित्रीकरण संपवून तो घरी परतत होता. दहिसर चेकनाका परिसरात वाहतूककोंडीमुळे गाडी थांबली, तेव्हा कोणीतरी जोरजोरात त्याच्या गाडीची काच बाहेरून ठोकत असल्याचे त्यांना जाणवले आणि त्याने काच खाली केली. तेव्हा ‘माझ्या पायावरून तुम्ही कार नेली,’ असा आरोप करत, एक इसम जोरजोरात बडबड करू लागला. सुमित त्याला ‘सॉरी’ बोलणार इतक्यात, कारच्या दुसऱ्या बाजूची काच कोणीतरी ठोकली. सुमितने ती काच उघडली, तेव्हा त्या ठिकाणीही एक व्यक्ती त्याच्यावर जोरजोरात ओरडू लागली. सुमितला त्याने बोलण्यात गुंतवले, ज्याचा फायदा उचलत पहिल्या इसमाने सुमितचा मोबाइल आणि पैशांचे पाकीट उचलत पळ काढला. याचदरम्यान दुसऱ्या इसमानेही पळ काढला. या प्रकरणी सुमितने रविवारी तक्रार दाखल केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)