Join us

अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 06:08 IST

घराच्या वादातून प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अभिनेता अरमान कोहलीला सांताक्रुझ पोलिसांनी मंगळवारी लोणावळा येथून अटक केली.

मुंबई - घराच्या वादातून प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या अभिनेता अरमान कोहलीला सांताक्रुझ पोलिसांनी मंगळवारी लोणावळा येथून अटक केली.सांताक्रुझ परिसरात कोहली राहण्यास आहे. गेल्या तीन वर्षांपासून रंधवा त्याला ओळखते. दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. गोवा येथील त्याच्या घरावरून दोघांमध्ये आर्थिक वाद होते. यातूनच त्याने घरी आलेल्या रंधवाला ३ जून रोजी मारहाण केली. केस ओढून भिंतीवर तिचे डोके आपटले होते. यामध्ये तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. रंधवाने सांताक्रुझ पोलिसांत ४ जून रोजी तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोहलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो मोबाइल बंद करून पसार झाला होता.मंगळवारी तो लोणावळा येथे असल्याची माहिती सांताक्रुझ पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सांताक्रुझ पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. कोहली हा प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. त्याने बॉलीवूडसह मालिकांमध्ये काम केले आहे. बिग बॉस ७मध्ये स्पर्धक असतानाही तो चर्चेत आला होता.यादरम्यान तेथीलच महिला स्पर्धकासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाईही कारण्यात आली होती. यात तो जामिनावर बाहेर आला होता. या प्रकरणानंतर त्याने आपला मोर्चा चित्रपटाकडे वळवला. २०१५मध्ये सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रातील करिअरची नव्याने सुरुवात केली होती. मात्र आता प्रेयसीला केलेली मारहाण आणि त्यानंतर तिने पोलिसांत केलेल्या तक्रारीमुळे तो पोलिसांच्या जाळयात अडकला आहे.

टॅग्स :अटकबातम्या