Join us

प्रचारासाठी कार्यकर्ते गावाकडे रवाना

By admin | Updated: October 10, 2014 02:23 IST

विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील नेत्यांनी गाव चलो अभियान राबविले आहे. मुंबई, नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्ते यापूर्वीच गावाकडे रवाना झाले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईविधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील नेत्यांनी गाव चलो अभियान राबविले आहे. मुंबई, नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्ते यापूर्वीच गावाकडे रवाना झाले आहेत. आता मतदारांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गावनिहाय बस, टेंपो व इतर वाहनांची सोय केली जात असून मतदार राजाला व्हीआयपी सुविधा देण्यात येणार आहेत. प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे ताकद आजमावत असल्यामुळे यावेळी बहुतांश सर्वच मतदार संघामध्ये चुरशीची लढाई सुरू झाली आहे. उमेदवारांनी प्रत्येक मतदारावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील नेत्यांनी मुंबईतील चाकरमान्यांना गावच्या विकासाचे साकडे घातले आहेत. आचारसंहितेपूर्वी मेळावे घेऊन गावाकडे चला असे आवाहन केले आहे. मागील पंधरा दिवसामध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी गावाकडे रवाना झाले आहेत. यामध्ये सातारा, कोरेगाव, कराड, भोर, जुन्नर व इतर मतदार संघांचा समावेश आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही कर्मचारी व माथाडी कामगार यापूर्वीच नेत्यांच्या प्रचारासाठी गावाकडे रवाना झाले आहेत. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कोरेगावमध्ये अनेकांनी तळ ठोकला आहे. इतर मतदार संघामध्येही पदाधिकारी गेले आहेत. आता मतदानादिवशी जास्तीत जास्त मतदारांना गावाकडे घेवून जाण्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे.गावाकडील नेत्यांनी प्रत्येक गावनिहाय मुंबईत असलेल्या मतदारांची नावे कळविली आहेत. या याद्या घेऊन कार्यकर्ते सर्वांशी संपर्क साधत आहेत. गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदानासाठी गावाकडे गेले पाहिजे अशा सूचना सर्वांना दिल्या जात आहेत. गावाकडे जाण्यासाठी मतदारांच्या संख्येप्रमाणे बस, टेंपो व इतर वाहने उपलब्ध करून दिली जात आहेत. वाहनांची बुकिंगही सुरू झाली आहे. मतदारराजाला येण्या-जाण्याचा खर्च व जेवणाची सोयही केली जाणार आहे. यावेळी मतदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त मतदार गावाकडे कसे नेता येतील, यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.