Join us

कुंभमेळ्यासाठी मुले पळविणारी टोळी सक्रिय; व्हॉटस अ‍ॅपवरील मेसेज

By admin | Updated: February 13, 2015 22:37 IST

कुंभमेळ्यासाठी मोठा भिकारी समुदाय पाहिजे, त्यासाठी ८०० जणांचा ताफा लहान मुलांना पळवून नेण्यासाठी भिवंडीत दाखल झाल्याचा मेसेज सोशल मीडियाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय

पंकज रोडेकर, ठाणेकुंभमेळ्यासाठी मोठा भिकारी समुदाय पाहिजे, त्यासाठी ८०० जणांचा ताफा लहान मुलांना पळवून नेण्यासाठी भिवंडीत दाखल झाल्याचा मेसेज सोशल मीडियाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय. याच मेसेजची ठाणे शहर सहपोलिसांनी दखल घेऊन संंबंधित विभागाला खबरदारीचे निर्देश दिले आहेत. तसेच मेसेजमध्ये काही मुलांना पळविल्याचे नमूद केले असले तरी तशी कोणतीच घटना अद्याप घडली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.कृपया काळजीपूर्वक वाचा...! खबरदार : तुमच्या लहानग्याला एकटे कुठेही पाठवू नका... कारण, अंदाजे ८०० पेक्षा जास्त भिकाऱ्यांचा ताफा भिवंडीत दाखल झालाय... ते लहान मुलांना एकटे पाहून उचलून नेतात... कारण, कुंभमेळ्यादरम्यान त्यांना खूप मोठा भिकारी समुदाय पाहिजे आहे! गेल्या शनिवारपासून आतापर्यंत साधारणत: १३ ते १५ मुलांच्या अपहरणाची नोंद झाली आहे... आपल्या घरातील लहानग्याला नजरेआड होऊ देऊ नका, असे मेसेज दररोज एकमेकांच्या मोबाइलवर फिरत आहेत. त्या मेसेजची दखल घेऊन भिवंडी परिमंडळाचे उपायुक्त सुधीर दाभाडे यांना संशयितरीत्या कोणी आढळल्यास खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटलाही दक्षता बाळगण्यास सांगून सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा प्रकारे मुले पळवून नेल्याची एकही तक्रार आली नसल्याची माहिती सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी लोकमतशी बोलताना दिली.