Join us

रक्ताच्या अहवालासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: September 25, 2014 01:35 IST

रुग्णाचे रक्त तपासण्यासाठी बाहेर द्यावे लागेल, असे सांगत रक्त तपासणीसाठी १००, ५०० प्रसंगी ७०० रुपये द्या,

पूजा दामले, मुंबईरुग्णाचे रक्त तपासण्यासाठी बाहेर द्यावे लागेल, असे सांगत रक्त तपासणीसाठी १००, ५०० प्रसंगी ७०० रुपये द्या, असे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांना गंडा घालणा-या दोघांना जे.जे.तील सतर्क कर्मचाऱ्यांनी पकडले. जे.जे. रुग्णालयाच्याच मध्यवर्ती प्रयोगशाळेतूनच ही रक्त तपासणी करून घेतली जाते. रुग्णांच्या नातेवाइकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फसवणाऱ्यांकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कडक नजर ठेवा, असा आदेशच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला आहे. कोपरखैरणे येथे सत्यप्रकाश या १९ वर्षीय मुलाला बुधवारी सकाळी जे.जे. रुग्णालयात आणले गेले. त्याला किडनीचा आजार असून सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. सत्यप्रकाश याच्या काही रक्त तपासण्या करायच्या होत्या. सत्यप्रकाश याच्याबरोबर त्याचे मेहुणे पी.डी. पांडे रुग्णालयात आले होते. सत्यप्रकाशचे नातेवाईक कोण, असे विचारणारा मुलगा आला. सत्यप्रकाशच्या काही रक्त तपासण्या करायच्या आहेत ना, त्या बाहेरून करून आणाव्या लागतील, यासाठी ७०० रुपये द्या, असे सांगून एका मुलाने माझ्याकडून पैसे घेतल्याचे पांडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या व्यक्तीने पुन्हा ५०० रुपयांची मागणी केली. त्या वेळी ही व्यक्ती फसवत असल्याने कर्मचाऱ्यांनी लक्षात आणून दिल्याचे पांडे यांनी सांगितले. सत्यप्रकाश याचा रक्त तपासणी अहवाल घ्यायला जेव्हा खोटे सांगून पैसे घेतलेला मुलगा मध्यवर्ती प्रयोगशाळेत गेला तेव्हा तिकडच्या कर्मचाऱ्यांना त्याचा संशय आला. म्हणून त्याच्याकडे रुग्णाची चौकशी केली. या वेळी त्याला नावाशिवाय काहीच माहिती नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला पकडण्यात आले, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी अपघात विभागात फेरी घेताना एक मुलगा मला तिथे दिसला. त्याच्याविषयी चौकशी केल्यावर त्याच्याविषयी कोणालाच माहीत नव्हते. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना अशा व्यक्ती दिसल्यास लक्ष ठेवा, असे डॉ. लहाने यांच्याकडून सांगितले होते. यानंतर हा मुलगा रक्त तपासणीसाठी लोकांकडून पैसे लुबाडत असल्याचे लक्षात आले होते. या वेळी त्याला पोलिसांच्या हवाली केले.