Join us

पानटपऱ्यांवर कारवाई होणारच - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 5, 2015 02:15 IST

शाळांपासून ५०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असली तरीही अनधिकृतरीत्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते.

मुंबई : शाळांपासून ५०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असली तरीही अनधिकृतरीत्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते. शाळांपासून ५०० मीटरच्या परिसरात असणाऱ्या टपाऱ्या बंद केल्या जातील, असे ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागात लहान मुले तंबाखूजन्य पदार्खांच्या आहारी गेल्याचे प्रमाण जास्त आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे. कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी व्हायला हवे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की टाटा रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी करण्यासाठी कर्करोगासाठी नवीन रुग्णालये तयार व्हायला हवीत. पण त्याच बरोबरीने जिल्हा पातळीवरील रुग्णालयांमध्ये आॅनकॉलॉजी विभाग सुरू करण्यात येतील. यामुळे तिथेच रुग्णांना उपचार मिळण्यास सुरुवात होईल. टाटा रुग्णालयाची कीर्ती !टाटा रुग्णालयाशी माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. माझ्या वडिलांना कर्करोग झाला होता. तेव्हा तीन महिने त्यांच्यावर टाटा रुग्णालयातच उपचार झाले होते. तीन महिने मी त्यांच्याबरोबर इथेच होतो. त्यामुळे मी टाटा रुग्णालय जवळून पाहिले आहे. तेव्हापासून आतापर्यंत रुग्णालय पाहताना प्रगती करतानाच दिसले आहे. जगभरात रुग्णालयाची कीर्ती पसरली आहे.नागपूर, चंद्रपूरमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या भागांमध्ये कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केल्यास प्रत्येक तिसऱ्या किंवा चौथ्या व्यक्तीनंतर कर्करोगासाठी असणाऱ्या अ‍ॅडव्हान्स तपासण्या करण्याची गरज भासेल.