Join us  

एसटी थांबविली नाही तर चालक-वाहकांवर कारवाई; महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:01 AM

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची राज्यभरातील एसटी स्थानकांवर मोठी गर्दी होत आहे.

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची राज्यभरातील एसटी स्थानकांवर मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

दुसरीकडे बसमध्ये जागा असूनही अनेक ठिकाणी एसटी बस थांबविल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतेच, शिवाय महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाकडून प्रवासी मित्र नेमण्यात आले असून, हे प्रवासी मित्र प्रवाशांना एसटीत चढ-उतारासाठी मदत करणार आहेत.

एसटी चालक - वाहक बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी असतानाही बस नियोजित थांब्यावर थांबवत नाहीत. सर्व्हीस रोडने जाऊन प्रवासी चढ - उतार न करता बस उडडाण पुलावरून नेतात. शिवाय प्रवाशांना नियोजित ठिकाणी उतरवत नाहीत,  तर उडडाणपुलाच्या मागे - पुढे उतरवितात आणि बस उडडाणपुलावरून नेतात.

१) बोरिवली - सायन मार्गे पुणे / कोकण प्रवासादरम्यान गोरेगाव, जोगेश्वरी आणि विलेपार्ले येथे चालक / वाहक बस थांबवत नाहीत. 

२) बोरिवली - ठाणे मार्गावर कासार वडवली, पातली पाडा, मानपाडा, माणकुली या थांब्यावर बस थांबत नाहीत. मुंबई - पनवेल मार्गावर मानखुर्द, जुईनगर, सीबीडी बेलापूर, कामोठे या थांब्यावर बस थांबविली जात नाही.

३) प्रत्येक विभागात, तालुक्यात असे महत्त्वाचे किमान दोन ते तीन थांबे असून, अशा घटनांमुळे प्रवाशांची गैरसोय आणि महामंडळाचे आर्थिक नुकसान होते आहे. 

४) हे थांबविण्यासाठी वाहक - चालकांना यासंदर्भातील सूचना करण्यास सर्व विभाग नियंत्रकांना सांगण्यात आले आहे.

चढ-उताराच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश-

१५ जूनपर्यंत सकाळी ८:०० ते ११:०० आणि सायंकाळी ४:०० ते रात्री ७:०० वाजेपर्यंत प्रवासी मित्र नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व विभाग नियत्रकांना यासंदर्भातील गर्दीची ठिकाणे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवासी मित्रांनी प्रवाशांच्या चढ - उताराच्या नोंदी ठेवायच्या आहेत. खातेप्रमुखास सादर करायच्या आहेत.

टॅग्स :मुंबईबसचालक