Join us  

प्रसारण रोखल्यास केबल चालकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 5:22 AM

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीमध्ये केबल चालकांवर अन्याय झाल्याचा आरोप केबल चालक करत असून त्याविरोधात असहकार्याची भूमिका घेण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीमध्ये केबल चालकांवर अन्याय झाल्याचा आरोप केबल चालक करत असून त्याविरोधात असहकार्याची भूमिका घेण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. मात्र, ट्रायने याबाबत कठोर पवित्रा घेतला असून केबलचे प्रसारण रोखल्यास कारवाईचा इशारा दिला.केबल टीव्ही नेटवर्क रेग्युलेशन अ‍ॅक्ट अन्वये केबल प्रसारण करण्यामध्ये अडथळा निर्माण केल्यास त्या कायद्याच्या तरतुदींचा भंग होतो. त्यामुळे त्यानुसार कारवाई करण्याचा इशारा ट्रायने दिला आहे. केबल चालकांनी केबल प्रसारण बंद करण्याचे पाऊल उचलून कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन ट्रायतर्फे करण्यात आले आहे. ट्रायचे उप सल्लागार शिवानी शर्मा यांच्या स्वाक्षरीने याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे. केबल टीव्ही कायदा १९९५ च्या कलम ४ ए व १० ए अन्वये कारवाई करण्याचा इशारा दिला.ग्राहकांना याबाबत माहिती देण्यासाठी वाहिन्यांनी मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट, कॉलसेंटर, एसएमएस सेवा, केबल टीव्ही आॅपरेटर आदींची मदत घेतल्याचा दावा ट्रायने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. ग्राहकांनी ट्रायच्या वेबसाईटवर जावून आवडीच्या वाहिन्या निवडाव्यात व त्यांचे मासिक बिल देखील पाहावे असा सल्ला ट्रायने दिला आहे. वेबसाईटवर वाहिन्यांची निवड केल्यावर व त्याचे मासिक बिल समोर आल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून त्याची प्रत केबल चालकाला देता येईल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. या वेबसाईटला देशभरातून साडेतीन कोटी जणांनी प्रतिसाद दिल्याचा दावा ट्रायने केला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात राज्यातील केबल चालकांनी ट्रायच्या नियमावली विरोधात २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत ३ तास ब्लॅक आऊट करुन आंदोलन केले होते.>टाटा स्कायला ट्रायची नोटीस : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांचा भंग करणाऱ्या टाटा स्कायला ट्रायने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. टाटा स्कायने त्यांच्या देशभरातील १७.७ दशलक्ष ग्राहकांना नवीन नियमावलीप्रमाणे वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय दिला नसल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती ट्रायच्या अधिकाºयांनी दिली. ट्रायच्या नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांना वाहिन्यांची निवड करण्याबाबत पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती टाटा स्कायतर्फे देण्यात आली.>मुदतवाढीची अफवादेशातील ४० टक्के ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची माहिती भरुन दिल्याचा दावा ट्रायने केला आहे. ३१ जानेवारीपर्यंत ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी द्यावी असे आवाहन ट्रायने केले आहे. ट्रायच्या या नियमावलीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार असल्याची अफवा पसरवण्यात येत असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.