Join us

कामात हयगय केल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 00:39 IST

रस्ते दुरुस्ती, दुभाजक, चौकांचे सुशोभिकरण करणे, फुटपाथवरील अतिक्रमण तोडून ते दुरुस्त करुन नागरीकांसाठी चालण्यासाठी मोकळे करुन देणे आदी

ठाणे : रस्ते दुरुस्ती, दुभाजक, चौकांचे सुशोभिकरण करणे, फुटपाथवरील अतिक्रमण तोडून ते दुरुस्त करुन नागरीकांसाठी चालण्यासाठी मोकळे करुन देणे आदी कामांना प्रथम प्राधान्य द्या, अशा सक्त सूचना देतानाच या कामात हयगय केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत दिला. विशेष म्हणजे त्यांनी पालिकेतील सर्व महत्त्वाच्या विभागातील झाडाझडती घेतली. तसेच महापालिकेची परवानगी न घेता, रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हे दाखल न करता कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. सोमवारी सायंकाळी ही बैठक झाली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांचा आढावा त्यांनी घेतला. रस्त्यावरील खड्डे व्यवस्थीत भरले गेले नाहीत, तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. रस्ते खोदाईसाठी जी परवानगी दिली जाते त्यासाठी मुख्यालयात एक स्वंतत्र कक्ष निर्माण करुन त्याअंतर्गत कोणत्या रस्त्यावर परवानगी देण्यात येणार आहे, ते किती दिवसात काम होणार आहे, काम झाल्यानंतर त्याचे पुनपृष्ठीकरण योग्य पध्दतीने केले आहे का? याची संपूर्ण माहिती कक्षाकडे असावी, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)