Join us

डबेवाल्यांचे नाव वापरल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 06:07 IST

कुरिअर सेवा देण्यावरून डबेवाल्यांच्या संघटनांत बुधवारी चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

मुंबई : कुरिअर सेवा देण्यावरून डबेवाल्यांच्या संघटनांत बुधवारी चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्यासोबत एका कुरिअर कंपनीने अ‍ॅपचे लोकार्पण केले. मात्र, ही सेवा मुंबईचे डबेवाले देणार नसल्याचा आरोप नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी केला आहे, तसेच मुंबईचे डबेवाले हा ब्रँड ट्रस्टकडे असून, त्याचा वापर विनापरवाना केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही मुके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.मुंबई प्रेस क्लबमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एका खासगी कंपनीने डबेवाल्यांना पार्ट टाइम नोकरी म्हणून कुरिअर सेवेची घोषणा केली. यामध्ये दुपारी २ वाजेनंतर सुमारे ३०० डबेवाले कुरिअर पोहोचविण्याचे काम करणार आहेत. या सेवेचे अनावरण करण्यासाठी सुभाष तळेकर स्वत: उपस्थित होते. मात्र, या सेवेशी मुंबईचे डबेवाले यांचा काहीही संबंध नसल्याचा आरोप मुखे यांनी केला आहे, तसेच मुंबईचे डबेवाले नाव वापरून कोणीही आर्थिक फायदा लाटणार असेल, तर कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याउलट तळेकर यांनी संबंधित संघटनेचा या कार्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.तळेकर म्हणाले की, डबेवाल्यांच्या विविध संघटना मुंबईत कार्यरत आहेत. गेल्या तीन पिढ्यांपासून तळेकर कुटुंब डबे पोहोचविण्याचे काम करत आहे. याशिवाय, डबे पोहोचवल्यानंतर डबेवाले कुरिअरचे काम करणार आहेत. त्यामुळे डबेवाल्यांना अतिरिक्त मोबदला मिळणार असेल, तर त्याला कुणाचाही आक्षेप नसावा, तसेच कोणत्याही कारवाई सामोरे जाण्याची तयारी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दर्शविली. या संदर्भात कुरिअर सेवा पोहोचविणाऱ्या कंपनीने आपण डबेवाल्यांशी वैयक्तिक करारनामा करत असल्याचे सांगितले.>... तर आक्षेप नसावाडबे पोहचवल्यानंतर डबेवाले कुरिअरचे काम करणार आहेत. त्यामुळे डबेवाल्यांना अतिरिक्त मोबदला मिळणार असेल, तर त्याला कुणाचाही आक्षेप नसावा, असे मत या वादासंदर्भात अधिक माहिती देताना सुभाष तळेकर यांनी सांगितले.