Join us  

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबद्दल २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:35 PM

धान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून  कारवाई करण्यात आली.

मुंबई : मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात गैरप्रकार करणाऱ्या  29  स्वस्त धान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून  कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.

मुंबई - ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या ए पी एल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरीता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत.  या  दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या 13 शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 4 शिधावाटप दुकाने रद्द करण्यात आली आहेत. 12 शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधान कार्यालयाच्या फिरत्या पथकामार्फत 3 ठिकाणी धाडी टाकून मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 एप्रिल रोजी शिधावाटप दुकान क्र.41-फ-218 येथे 30 हजार 72 रुपये किंमतीचा 1200 कि.ग्रॅ. अतिरिक्त गहू, जप्त करण्यात आला. याबाबत नयानगर पोलीस ठाणे, जि.ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 6 जून रोजी दुकान क्र.33-ई-143 येथे टेम्पो क्र.एम.एच.-03-सी.पी.-3397 मधून 2783 कि.ग्रॅ. तांदूळ व  446 कि.ग्रॅ. गहू जप्त करण्यात आला. त्याची  किंमत 4 लाख 61 हजार 420 रुपये असून टिळकनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 9 जून रोजी तुर्भे येथे पेट्रोल / डिझेल टँकर क्र.एम.एच.-06-बी.डी.-3777 मधून अवैधरित्या डिझेल चोरी प्रकरणी 33 लाख 15 हजार 692 रुपये किंमतीचे डिझेल जप्त करण्यात आले. या प्रकरणी तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे,  अशी माहिती पगारे यांनी दिली.

टॅग्स :अन्नकोरोना वायरस बातम्यामुंबईठाणे