नवी मुंबई : बनावट माल विक्री प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तीन दुकानांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये ५३ हजार रुपये किमतीचा एल अँड टी कंपनीच्या नावाचा बनावट माल आढळून आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लार्सन अँड टर्बो कंपनीच्या नावाचा बनावट माल बाजारात विकला जात असल्याची तक्रार कंपनीला मिळाली होती. या तक्रारीनुसार केलेल्या पाहणीत तुर्भे जनता मार्केट परिसरातील दुकानांमध्ये एल अँड टीचा बनावट माल विकला जात असल्याचे समोर आले. त्यानुसार इ.आय.पी. आर. इंडिया कंपनीच्या तपास अधिकाऱ्यामार्फत तेथे छापा टाकण्यात आला. एल अँड टी कंपनीच्या नावाने बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट साहित्यांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान तपास अधिकारी सूर्यकांत खरात यांना तुर्भे जनता मार्केट येथील तीन दुकानांची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीएमसी पोलिसांच्या मदतीने बुधवारी त्यांनी सदर दुकानांवर छापा टाकला. यावेळी दुकानात एल अँड टी कंपनीच्या नावाच्या असलेल्या उत्पादनांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये तीन दुकानांमध्ये एकूण ५३ हजार रुपये किमतीचे बनावट साहित्य आढळून आले. एल अँड टी कंपनीच्या नावाने त्यांची विक्री करून ग्राहकांची व मूळ कंपनीची फसवणूक केली जात होती. अंबिका इलेक्ट्रिक्स, महावीर इलेक्ट्रॉनिक व तुर्भे इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर या दुकानांवर ही कारवाई झाली आहे. या दुकानांमध्ये एल अँड टीच्या नावाचे स्वीच, फ्युज, कॉईल, अलार्म कंडक्टर अशी बनावट उपकरणे विकली जात होती. त्यानुसार भीमराम पटेल (४७), मोहन जैन (४०) आणि सुप्रास जैन (४५) यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बनावट उत्पादने जप्त केली. (प्रतिनिधी)
बनावट उत्पादने विकणाऱ्या दुकानांवर कारवाई
By admin | Updated: December 27, 2014 00:43 IST