Join us

अनियमिततांबाबत पालिकेची कारवाई

By admin | Updated: July 29, 2015 02:10 IST

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल्सची संयुक्त पाहणी करण्यात येत असून, या मॉल्सच्या बांधकामांसह उर्वरित बाबींमध्ये अनियमितता आढळून आल्यास त्यावर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल्सची संयुक्त पाहणी करण्यात येत असून, या मॉल्सच्या बांधकामांसह उर्वरित बाबींमध्ये अनियमितता आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.वांद्रे पश्चिमेकडील लिकिंग रोडवरील केनिलवर्थ शॉपिंग मॉलला २१ जुलै रोजी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अजय मेहता यांनी दिलेल्या आदेशानुसार, सर्व मॉल्सची संयुक्त पाहणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध मॉल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या आहेत. या अनियमिततांमध्ये अनाधिकृत बांधकामे, चटई क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन, अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना नसणे, अनधिकृतपणे पार्टीशन टाकून एका दुकानाची दोन दुकाने करणे किंवा मधली भिंत पाडून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गाळ्यांचे रूपांतर एका गाळ्यात करणे यांसारख्या अनियमितांचा समावेश आहे.सर्व अनियमिततांबाबत सर्व मॉल्स, संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अनियमितता दूर करण्याबाबत कार्यवाही झाली नाही, तर महापलिकेद्वारे संबंधित मॉल्सवर, संबंधितांवर नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत संयुक्त पाहणी पथकाद्वारे खार पश्चिम परिसरातील श्रीजी प्लाझा/झैन आर्केड, लिंक कॉर्नर मॉल, क्रीस्टल शॉपर्स पॅराडाईज मॉल, लिंक स्क्वेअर मॉल आणि वांद्रे परिसरातील न्यू ब्युटी सेंटर आदी मॉल्सची पाहणी करण्यात आली आहे.