ठाणे : नाल्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा धडाका पालिकेने हाती घेतला असतांनाच आता पुढील टप्यात रस्त्यालगतच्या फुटपाथा दरम्यानच्या मार्जिनल फ्रन्ट ओपन स्पेसवर अतिक्रमण करुन दुकानदारी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता अशा अतिक्रमणांचा सर्व्हे हाती घेण्यात येणार असून पदपथ आणि नाल्यावरील बांधकामे हटविल्यानंतर या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. ओपन हाऊसच्या खाऊगल्लीत ज्याप्रमाणे इमारतींपुढे वाढीव बांधकामे झालेली आहे, तशा स्वरुपाची शहरातील सर्व बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत.गेल्या आठवड्यात आयुक्तांनी फुटपाथवरील अतिक्रमणे, नाल्यावर प्रत्यक्ष असलेली अतिक्रमणे आणि नाल्याच्या दोन्ही बाजूला १२ फुटापर्यंत असलेली बांधकामे, यावर सोमवार पासून १० प्रभाग समिती अंतर्गत कारवाई सुरु झाली आहे. परंतु आता यापुढेही जाऊन केवळ रस्ते आणि पदपथच नव्हे तर इमारती आणि पदपथांमध्ये जी मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे ती अनेक व्यापारी गाळ्यांनी अतिक्रमित केलेली आहे. अगदी फूटपाथला खेटून व्यवसाय केला जातो. नियमानुसार ही बांधकामे अनिधकृत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करणे क्रमप्राप्त आसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अनेक ठिकाणी मार्जिनल स्पेसवर अतिक्रमणकोणत्याही बांधकामाला मंजूरी देताना त्याच्या चोहोबाजूंनी मार्जिनल ओपन स्पेस ठेवण्याचे बंधन असते. ती स्पेस कमीत कमी तीन मीटर आणि जास्तीत जास्त नऊ मीटरपर्यंतची असू शकते. ही जागा नियमानुसार मोकळी ठेवावी लागते. मात्र, अनेक ठिकाणी त्यावर अतिक्रमण केले गेल्याचे पालिकेने सांगितले. जुन्या ठाणे शहरात असे अतिक्र मण प्रामुख्याने दिसते. त्यामुळे या मार्जिनल ओपन स्पेसची तपासणी करून त्यापुढील बांधकाम बेकायदा ठरविले जाईल. त्या बांधकामांना आयुक्तांचे अभय : एक लाल रेषा आखून त्यापुढील बांधकाम जमिनदोस्त केले जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. राम मारूती रोड आणि गोखले रोड या प्रमुख रस्त्यांची रुंदी पूर्वी कमी होती. त्यावेळी मार्जिनल स्पेस सोडून झालेली बांधकामे रस्ता रु ंदीकरणामुळे पदपथांच्या तोंडावरच आलेली आहेत. अशा बांधकामांवर मात्र पालिका कारवाई करणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मोकळ्या जागा हडपणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई
By admin | Updated: October 6, 2015 23:58 IST