Join us
Daily Top 2Weekly Top 5

भागवत धाम मंदिरात आरतीऐवजी हाणामारी

By admin | Updated: December 4, 2014 01:17 IST

सीबीडी येथील भागवत धाम मंदिरात बुधवारी सकाळी आरती सुरू असताना हाणामारीची घटना घडली. मंदिराच्या संपत्तीवरून दोन ट्रस्टींमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला

नवी मुंबई : सीबीडी येथील भागवत धाम मंदिरात बुधवारी सकाळी आरती सुरू असताना हाणामारीची घटना घडली. मंदिराच्या संपत्तीवरून दोन ट्रस्टींमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी २० महिलांना अटक केली आहे. या हाणामारीत मंदिराच्या दानपेटीतील रक्कम लुटली गेली असून काही पुजाऱ्यांचे मोबाइल व सोनेही चोरीला गेले आहेत. सीबीडीच्या पारसिक हिल येथील भागवत धाम मंदिराच्या संपत्तीवरून दोन ट्रस्टींमध्ये वाद सुरू आहेत. अशातच एका ट्रस्टीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. दोन ट्रस्टींच्या वादाचे हे प्रकरण न्यायालयात देखील प्रलंबित आहे. सध्या एका ट्रस्टीने मंदिरात आपले पुजारी नेमलेले आहेत. त्यांना मारहाण करून हाकलण्यासाठी दुसऱ्या ट्रस्टीने तेथे हल्ला घडवून आणला. सकाळी आरती सुरू असताना काही महिला तेथे आल्या. या महिलांनी मंदिरातील पुजाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना मारहाण करून त्यांना मंदिरातून बाहेर काढले. या प्रकारात मंदिरातील साहित्यासह परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांचीही तोडफोड झाली. त्यानंतर या महिलांनी मंदिराला कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. याप्रकरणी घटनास्थळावरून २३ महिलांना व एका पुरुषाला अटक केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले. त्यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ट्रस्टींच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बांद्रा येथे राहणाऱ्या प्रमिला राठोड या महिलेने साथीदार महिलांसह हा हल्ला केला. यासाठी सुमारे २५ महिला नालासोपारा येथून बस व इनोव्हा कारमधून सीबीडी येथे आल्या होत्या. (प्रतिनिधी)