Join us

मुंबईत ‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत अडीच हजार चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST

२२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन : ८ हजार ५९७ वाहनांची तपासणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात ...

२२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन : ८ हजार ५९७ वाहनांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात मुंबई पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’अंतर्गत ३ तासांत मुंबईतील ८ हजार ५९७ वाहनांची तपासणी करून २ हजार ४७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.

यादरम्यान मुंबईत १०१ ठिकाणी नाकाबंदी करून ८ हजार ५९७ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये २ हजार ४७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हअंतर्गत १२ वाहनांची तपासणी झाली.

२२३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये अभिलेखावरील १ हजार ३६९ आरोपी तपासण्यात आले. यात ५२ पाहिजे व फरारी आरोपींना अटक करण्यात आली, तसेच २ सोनसाखळी चोरांनाही ताब्यात घेण्यात आले.

* अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या ३३ जणांवर कारवाई

अमली पदार्थविरोधी पथकाने ६६ ठिकाणी कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकूण ३३ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त केली. ७३९ हॉटेल, लॉज, मुसाफिर खान्यांची झाडाझडती घेण्यात आली. ३१ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे टाकून ४० जणांवर कारवाई करण्यात आली, तसेच अजामीनपात्र वॉरंटमधील एकूण ५९ आरोपींना अटक करण्यात आली.

.........................