Join us

आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका

By रेश्मा शिवडेकर | Updated: June 21, 2024 21:26 IST

आयआयटीच्या वार्षिक कला महोत्सवात रामायणाची कथित विटंबना करणाऱया नाटकात काम केल्याबद्दल संस्थेने आठ विद्यार्थ्यांना १.२० लाखांपर्यंतचा दंड केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रामायणावर बेतलेल्या राहोवन नामक नाटकात काम करणाऱया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) आठ विद्यार्थ्यांवर संस्थेने केलेली कठोर दंडात्मक कारवाई म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याची टीका स्टुड्ंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेने केली आहे. एसएफआयने संस्थेच्या कारवाईचा निषेध केला आहे. संस्थेने केलेली कारवाई विद्यार्थ्यांच्या विचारस्वातंत्र्याला मारक असल्याची टिका करत ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

आयआयटीच्या वार्षिक कला महोत्सवात रामायणाची कथित विटंबना करणाऱया नाटकात काम केल्याबद्दल संस्थेने आठ विद्यार्थ्यांना १.२० लाखांपर्यंतचा दंड केला आहे. तसेच चार विद्यार्थ्यांना वसतीगृहातील सुविधा नाकारण्यात आल्या आहेत. स्त्रीवादी भूमिका मांडणाऱया या नाटकामुळे कुणाच्या भावना दुखावू नयेत, याकरिता पुरेशी काळजी घेण्यात आली होती. तरिही नाटकाचा सामाजिक आशय लक्षात न घेता विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या रकमेचा दंड करण्यात आल्याने आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

ही कारवाई म्हणजे एकाधिकारशाहीचे लक्षण आहे. या विद्यार्थ्यांच्या मागे एसएफआय ठामपणे उभी असून कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा ती बौद्धिक दिवाळखोरी ठरेल, अशा कठोर शब्दांत एसएफआयने विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.

राहोवन हे नाटक रामायणावर थेट बेतलेले नाही. हे स्त्रीवादी भूमिकेतून लिहिलेले नाटक असून त्यात स्त्रियांची सुरक्षा, पितृसत्ताक व्यवस्थेतील स्थान यावर भाष्य करण्यात आले आहे. तासभर चाललेल्या या नाटकावर प्रेक्षक किंवा परीक्षकांकडून कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता. असे असताना अचानक एका समाजमाध्यमावरील चर्चेनंतर ते आक्षेपार्ह कसे ठरते, असा प्रश्न एसएफआयच्या सचिव रोईना क्षीरसागर यांनी केला आहे. 

टॅग्स :आयआयटी मुंबई