Join us

शुल्काअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

शिक्षणमंत्र्यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष हे आणखी काही महिने ऑनलाइन सुरू राहणार असून यामध्ये ...

शिक्षणमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष हे आणखी काही महिने ऑनलाइन सुरू राहणार असून यामध्ये केवळ शुल्काअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला ऑनलाइन वर्ग किंवा शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. असा प्रकार घडल्याचे लक्षात येताच सदर शैक्षणिक संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाइन सुरू करण्यात आलेल्या शाळांच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्याची ऑनलाइन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वंकक्ष पद्धतीने केले जाईल, अशी महितीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या अध्ययनासोबत त्यांच्या परीक्षेची तयारी करून घेण्याचे आव्हानात्मक काम ब्रीज कोर्सच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल आणि २ महिन्यांच्या उजळणीनंतर खऱ्या अर्थाने ऑगस्टमध्ये नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांची अध्ययनाची प्रक्रिया अधिक सुलभ, सहज करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये झूमद्वारा वर्ग, दूरदर्शन, यूट्युब, दीक्षा ॲप, व्हॉट्सॲप अशा प्रणालींचा वापर करून सदर प्रक्रिया सुरळीत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही!

परीक्षेद्वारे मूल्यांकन करत असतानाच विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करून यावर्षी विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात येईल. या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. नव्या शैक्षणिक वर्षात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. सोबतच पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.