Join us

मुंबईतील ‘बत्ती गुल’ विरोधातील कारवाई वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:24 IST

निलंबित कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी आंदोलनाचा पवित्रालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील बत्ती गुल होण्यास जबाबदार असल्याचा ...

निलंबित कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी आंदोलनाचा पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील बत्ती गुल होण्यास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापारेषणच्या वाशी परिमंडळातील ४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यापैकी एक अधिकारी त्या दिवशी सुट्टीवर होता. तर, दुसऱ्याची ड्युटी तीन तास आधी संपली होती. अन्य दोघांचाही कोणताही दोष नसताना त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा सूर अभियंत्यांच्या संघटनांनी आळवला आहे. निलंबन मागे घेण्यासाठी ऊर्जामंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारीही सुरू झाली आहे.

टाटाची आयलॅण्डिग यंत्रणा फेल झाल्यामुळे १२ ऑक्टोबर रोजी भरदिवसा मुंबई अंधारात बुडाली होती. या तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच महापारेषणच्या वाशी परिमंडळातील चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु, यापैकी एक अधिकारी त्या दिवशी सुट्टीवर होते. दुसऱ्या अधिकाऱ्याची ड्यटी तीन तास आधी संपली होती. ४०० केव्ही यंत्रणांच्या कामाचा भार सांभाळण्यासाठी एक अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक आर्टीझन आणि एक हेल्पर कार्यरत ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, त्या दिवशी एक अधिकारी आणि आऊटसोर्स केलेल्या टेक्निशियनच्या भरवशावर काम केले जात होते.

वरिष्ठ कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, पुरेशा कर्मचाऱ्यांची वानवा, कालबाह्य यंत्रणा, दुरुस्तीकडे दुर्लक्ष अशा असंख्य अडचणी असताना कामावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणार कसे, असा सल्ला अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्रातील या तांत्रिक त्रुटींच्या विरोधात सातत्याने प्रशासनाला अवगत केले जात होते. मात्र, अधिकाऱ्यांची आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

* तब्बल ५५ टक्के पदे रिक्त

वाशी परिमंडळात कर्मचाऱ्यांची एकूण २३०६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १०४९ पदे भरण्यात आली असून तब्बल ५५ टक्के पदे रिक्त आहेत. ऑगस्ट महिन्यात कंपनीने २३ अभियंत्यांच्या बदल्या परिमंडळाबाहेर केल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. अनेकांना साप्ताहिक सुट्टी घेणेही शक्य होत नसून त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर होत आहेत. त्यामुळे १७० कर्मचाऱ्यांनी वाशी परिमंडळाबाहेर बदली करण्यासाठी विनंती अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे.

..............................