Join us
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्या ९00 जणांवर कारवाई

By admin | Updated: June 1, 2015 02:25 IST

रेल्वेचे नियम मोडणाऱ्या पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई केली असून, २६ जूनपासून केलेल्या कारवाईत ९00 जण अडकले आहेत

मुंबई : रेल्वेचे नियम मोडणाऱ्या पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई केली असून, २६ जूनपासून केलेल्या कारवाईत ९00 जण अडकले आहेत. यात सर्वाधिक कारवाई महिला तसेच अपंग प्रवाशांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून साजरा केल्या जाणाऱ्या प्रवासी उपभोक्ता पंधरवड्यानिमित्ताने ही विशेष कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात रेल्वे पोलीस आणि टीसींकडून कारवाई केली जाते. कधीकधी तर विशेष कारवाईदेखील हाती घेतली जाते. यात अपंग प्रवाशांच्या डब्यांबरोबरच महिला प्रवाशांच्या डब्यांत घुसखोरी करणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई केली जाते. पश्चिम रेल्वेकडून २६ जूनपासून प्रवासी उपभोक्ता पंधरवडा साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई हाती घेण्यात आली होती. यात विशेष रेल्वे सुरक्षा दलाच्या ५८ पथकांचा समावेश होता. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ९00 जण अडकल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. यात मुख्यत्वे अपंगांच्या आणि महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या ३७४ जणांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त रेल्वे तसेच स्थानक परिसरात फेरीवाल्यांचाही उच्छाद वाढला असून, त्यांच्याविरोधात केलेल्या कारवाईत २७९ जण पकडले गेले आहेत. तसेच १५ गर्दुल्ले आणि तृतीयपंथी तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या २६७ जणांना पकडण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे या विशेष कारवाईदरम्यान तीन दलालांवरही कारवाई केली गेली आहे. या विशेष कारवाईतून १ लाख ३६ हजार रुपये दंड पश्चिम रेल्वेला मिळाला. (प्रतिनिधी)