मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील ‘सिटी किनारा’ उपाहारगृह दुर्घटनेप्रकरणी अखेर दीड महिन्याने महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाय त्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्याचा प्रस्ताव आयुक्त अजय मेहता यांनी स्वीकारला आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी उपाहारगृह मालक सुदीश हेगडे यालाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे विनोबा भावेनगर पोलिसांनी सांगितले.१६ आॅक्टोबर रोजी कुर्ला येथे झालेल्या उपाहारगृह दुर्घटनेत आठ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी उपायुक्त भरत मराठे यांची विशेष चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने सिटी किनारा उपाहारगृह दुर्घटनेबाबत सर्वंकष चौकशी करून याबाबतचा अहवाल अजय मेहता यांच्याकडे सादर केला. अहवालानुसार सिटी किनारा उपाहारगृहात दुर्घटनेबाबत महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार त्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्वीकारला आहे. दुर्घटनेबाबत महापालिकेच्या ‘एल’ विभागातील संबंधित चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये एक कनिष्ठ अभियंता, दोन स्वच्छता निरीक्षक व एक मुकादम यांचा समावेश आहे.सिटी किनारा उपाहारगृहाला गॅस सिलिंडर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीद्वारे संबंधित वितरक व संनियंत्रण करणारे संबंधित कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत संबंधित गॅस सिलिंडर पुरवठादार कंपनीला महापालिकेद्वारे कळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या ४ कर्मचाऱ्यांवर कारवाई
By admin | Updated: December 2, 2015 03:31 IST