Join us

पश्चिम रेल्वेवर ऐसपैस प्रवास, सोमवारपासून १५ डब्यांच्या आणखी ६ लोकल चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 13:48 IST

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यातून कायम दाटीवाटीचा आणि असह्य वाटणारा प्रवास करावा लागत होता.

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. आता १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी ६ फेऱ्या वाढविण्यात येणार असून, त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवास ऐसपैस आणि गर्दीमुक्त होऊ शकणार आहे.  त्यामुळे आता १५ डब्बा लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या १४४ वरून १५० वर पोहोचणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यातून कायम दाटीवाटीचा आणि असह्य वाटणारा प्रवास करावा लागत होता. इतकेच नव्हे, तर गेल्या वर्षी लोकलमधील जागेवरून प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटनाही वाढलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल सेवेची आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २१ नोव्हेंबर, २०२२ पासून बारा डब्यांची लोकल १५ डब्यांच्या लोकलमध्ये परावर्तित करून पंधरा डब्यांच्या २६ लोकल पश्चिम मार्गावर धावायला सुरुवात झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

आता पश्चिम रेल्वेने आणखी १२ डब्बा लोकलला आणखी ३ डब्बे जोडून १५ डब्बा लोकलच्या ६ फेऱ्या २७ मार्च, २०२३ पासून वाढविण्याचा निर्णय घेतला. नवीन फेऱ्या विरार ते अंधेरी, नालासोपारा ते अंधेरी आणि विरार ते बोरीवलीच्या दरम्यान चालविल्या जातील.

असे आहे वेळापत्रक - या लोकल धावणार १५ डब्बा  अप मार्ग   विरार ते अंधेरी - स.९.०५ (जलद)   नालासोपारा ते अंधेरी - संध्या.५.५३ वा.(धिमी)   विरार ते बोरीवली- संध्या ७.५५वा(धिमी) डाऊन मार्ग   अंधेरी ते नालासोपारा - स.१०.१३ (जलद)   अंधेरी ते विरार - संध्या ६.५०वा. (धिमी)   बोरीवली ते विरार- रा.८.४वा.(धिमी)

टॅग्स :मुंबई लोकल