मुंबई : धारावी येथे धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी साजिद समद खान ऊर्फ लाला या आरोपीला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. २२ जुलै २0१४ रोजी वांद्रे लिंकिंग रोड येथे जाऊ इच्छिणाऱ्या ३४ वर्षीय विधवा महिलेला रिक्षाचालकाने चुकीने धारावी टी जंक्शन येथे सोडले होते. त्यानंतर इनोव्हा कारने तेथे आलेला आपला परिचित आबाद अन्सारी आणि साजिद समद खान यांनी अन्य दोघा जणांच्या मदतीने धावत्या कारमध्येच आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी साजिद खानच्या वतीने अॅड. महेश वासवानी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्या. एम.एस. शर्मा यांच्यासमोर युक्तिवाद केला. वैद्यकीय अहवालात आरोपीने बलात्कार केला नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच पॉलिग्राफ चाचणीही निगेटिव्ह आली होती. अन्य आरोपी आबाद अन्सारी गुन्हा घडला तेव्हा त्याच्या पत्नीसह घटनास्थळापासून पाच किमी अंतरावरील भारत नगरातील ज्वेलर्सच्या दुकानात उपस्थित होता, असे निष्पन्न झाल्याने त्याला आधीच अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. आरोपी तपासात सहकार्य करीत असल्याने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद अॅड. महेश वासवानी यांनी केला. पोलिसांनी आरोपींची इनोव्हा कार जप्त करायची असल्याचे न्यायालयाला सांगितले असता, गुन्हाच घडला नसल्याने कार जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे अॅड. वासवानी यांनी सांगितले. गुन्हा घडला तेव्हा साजिद खान मीरा रोड येथे होता. मात्र पोलिसांनी त्या बाबतच्या जबानी नोंदवल्या नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यांच्यासोबत अॅड. धारिणी नागदा, अॅड. अनुश्री कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने साजिद खानला १५ हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच दर शनिवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर
By admin | Updated: June 8, 2015 03:53 IST