चेंबूर : अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन पसार झालेल्या दोन आरोपींना गोवंडी पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे अटक आरोपीदेखील इंजिनीअरिंगचेच विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. चेंबूर येथे राहणारा आदित्य रामचंद्रन या विद्यार्थ्याला आॅगस्ट महिन्यामध्ये इंजिनीअरिंगला अॅडमिशन हवी होती. याबाबत त्याने अनेक मित्रांना सांगितले. मात्र टक्केवारी कमी असल्याने त्याला सहज अॅडमिशन मिळत नव्हती. याच दरम्यान घाटकोपरच्या सोमय्या महाविद्यालयात अॅडमिशन मिळू शकते, अशी माहिती त्याच्या एका मित्राने त्याला दिली. यासाठी घाटकोपर परिसरातच राहणाऱ्या आशिष दीक्षित (२२) आणि प्रतीक देसाई (२२) या दोघांना भेटण्याचे त्याने त्याला सांगितले. त्यानुसार आदित्य या दोघांना भेटला. त्याने सोमय्या महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून अॅडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन आदित्यला दिले. मात्र यासाठी ४ लाख ३० हजार रुपये द्यावे लागतील, असेही या आरोपींनी सांगितले.आदित्यने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनीदेखील ही रक्कम देण्याचे कबूल केले. त्यानुसार पहिल्यांदा त्यांनी १ लाख ३० हजार आणि आदित्यची कागदपत्रे या आरोपींकडे दिली. त्यानंतर एक महिना उलटूनदेखील या आरोपींकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी त्यांना भेटून विचारपूस केली. मात्र त्यांच्याकडून अनेकदा उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. काही दिवसांनंतर दोन्ही आरोपींचे मोबाइल फोन बंद लागू लागले. त्यातच अॅडमिशनची तारीख निघून गेली असताना ओरिजनल सर्टिफिकेटदेखील आरोपींकडे असल्याने आदित्यचे वर्षही फुकट गेले होते. फसवणूक झाल्याचे रामचंद्रन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नावाव्यतिरिक्त या दोन्ही आरोपींचा पत्तादेखील पोलिसांना माहीत नव्हता. शिवाय त्यांचे मोबाइल फोनदेखील बंद असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांपुढेदेखील एक आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची मदत घेतली. याच दरम्यान हे दोन्ही आरोपी घाटकोपर परिसरातील एका पान टपरीवर नियमित सिगारेट पिण्यासाठी येत असल्याची माहिती एका विद्यार्थ्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच या आरोपींकडून विद्यार्थ्यांचे ओरिजनल सर्टिफिकेटदेखील हस्तगत केले असून अशा प्रकारे या आरोपींनी आणखी कोणाला गंडा घातला आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना गंडा घालणारे आरोपी अटकेत
By admin | Updated: January 1, 2015 01:41 IST