Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या दुहेरी हत्याप्रकरणातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:07 IST

गुन्हे शाखेची कारवाईगोव्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या दुहेरी हत्याप्रकरणातील आरोपी जेरबंदगुन्हे शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोव्यातील ...

गुन्हे शाखेची कारवाई

गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या दुहेरी हत्याप्रकरणातील आरोपी जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोव्यातील दोन वृद्धांची हत्या करून पसार झालेल्या त्रिकूटाला गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने मंगळवारी बेडया ठोकल्या आहेत. रविनकुमार सादा (१८), आकाश घोष (२०) आणि आदित्यकुमार खरवाल (१८) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील मडगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक मिंगल मिरांडा (६८) आणि आई कँथरीन पिंटो (८६) यांची रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान निर्घुण हत्या करत आरोपी पसार झाले. या घटनेने खळबळ उडवली. याप्रकरणी फटोर्डा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

घटनेनंतर मिरांडा यांच्याकडे नोकरीला असलेले सादा, घोष आणि खरवाल हे घटनेनंतर पसार झाले होते. या तिघांनीच हे कृत्य केल्याच्या दाट शक्यतेतून गोवा पोलिसांनी त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून मुंबई पोलिसांकडेही मदत मागितली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष चारचे प्रमुख पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.

अशात तिघेही संशयित शिवाजी पार्क परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच, पथकाने त्रिकुटाला बेडया ठोकल्या. सादा हा बिहारमधील तर, घोष आणि खरवाल हे दोघेही झारखंडचे रहिवासी आहेत. केलेल्या कामाचे वेळेत पैसे न दिल्याने मिरांडा आणि त्यांच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींचा ताबा गोवा पोलिसांकड़े देण्यात आला आहे.