मुंबई : मागील आठवड्यात अंधेरी परिसरात रिक्षाचालकावर गोळीबार करणारा कुख्यात गुंड अमजद मुजावर शेख याला अखेर मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. या हल्ल्यानंतर तो पसार झाला होता. मात्र अंधेरी पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत त्याच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी रात्री शेखने त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या विठोबा सुत्रवे या रिक्षाचालकावर गोळीबार केला होता. यात ते जखमी झाले होते. सुत्रवे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर शेख हा पसार झाला. मात्र आम्ही सतत त्याच्या मागावर होतो. अखेर मंगळवारी तो मुंबईत एका ठिकाणी आल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार सापळा रचत आम्ही त्याचा गाशा गुंडाळला. शेखचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मंगळवारी स्थानिक न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता न्यायालयाने शेख याला ३० मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
अंधेरी गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक
By admin | Updated: May 26, 2016 01:03 IST