Join us  

बँक बंद पडल्याच्या अफवेने खातेदार धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:49 AM

पीएमसी बँकांभोवती पोलिसांचा बंदोबस्त; कुठे हंबरडा तर कुठे संतापामुळे शाखांच्या परिसरात तणाव

मुंबई : सकाळी मोबाइलवर खणाणलेल्या संदेशाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँक खातेदारांची झोपच उडाली. त्यात बँक बंद पडल्याच्या अफवेने डोकेवर काढल्याने खातेदारांनी मंगळवारी बँकांना घेराव घातला. गर्दी, गोंधळ आणि तणावाने बँक परिसर हादरून गेला होता. वाढत्या गर्दीमुळे पोलिसांनीही बँकांभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.पीएमसी बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरू ठेवण्यास आरबीआयने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सहा महिने बँकेचे व्यवहार बंद राहणार आहेत. सोमवारी रात्रीच याबाबत बँकेच्या विविध शाखांमधील व्यवस्थापकांना सूचित करण्यात आले होते. त्यानुसार, रात्रीच बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बॅँकेच्या शाखांकडे धाव घेतली, तसेच पोलीस बंदोबस्तही रात्रीपासूनच तैनात करण्यात आला. पीएमसीच्या महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश आणि नवी दिल्लीमध्ये शाखा आहेत. मुंबईत बँकेचा ४० शाखा आहेत.मंगळवारी सकाळी ९च्या सुमारास याबाबतचे संदेश खातेदारांच्या मोबाइलवर धडकताच खातेदारांची तारांबळ उडाली. बँक बंद झाली म्हणत खातेदारांनी बँकेकडे धाव घेतली. मुंबईत सकाळी ज्येष्ठांनी तर बँक गाठून हंबरडा फोडला. भांडुप ड्रिम्स मॉलमध्ये बँकेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरची गर्दी रस्त्यापर्यंत आली होती. भांडुपच्या रहिवासी असलेल्या शांती गुप्ता यांच्या मुलीचे पुढच्या महिन्यात लग्न आहे.लग्नासाठी त्यांनी एका पतपेढीतून ७ लाखांचे कर्ज घेतले आणि ते पैसे पीएमसी बँकेच्या भांडुप शाखेत जमा केले. त्यात आता सहा महिने पैसेच हाती लागणार नसल्याच्या चिंतेने त्यांनी बँकेतच तळ ठोकला होता. व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे. चालू खात्यांतून दैनंदिन व्यवहार चालतात. त्यात अचानक व्यवहार बंद झाल्यामुळे त्यांचे व्यवहारही ठप्प झाल्याचे व्यावसायिक चंद्रशेखर परब यांनी सांगितले.पीएमसी बँकांच्या शाखांमध्ये वाढत्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांनादेखील परिस्थिती हाताळताना नाकी नऊ आले होते. काहींनी तर थेट फेसबुक लाइव्ह अथवा व्हिडीओ काढून सोशल मीडियाद्वारे याबाबत खेद व्यक्त केला. कुठे हंबरडा तर कुठे संतापामुळे बँकेच्या अनेक शाखांच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे बँक कर्मचारीही धास्तावले होते.एक हजार रुपयांत खर्च कसा भागवायचा, हतबल ग्राहकांचा सवालसहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये काढता येणार, पण बँकेकडून एक हजार रुपयेच दिले जाणार, मग खातेधारकांनी आता बँकेत पैसे कशाला भरायचे. पीएमसी बँकेची चौकशी सुरू आहे. लवकरच समस्या सुटतील आणि पूर्वीसारखे आर्थिक व्यवहार सुरू होतील, असे चौकशीदरम्यान बँकेच्या कर्मचाºयांनी सांगितले.- ललिता यादव, खातेधारकमाझ्या सासºयांचे पैसे पीएमसी बँकेत आहेत. बँकेमध्ये घोटाळा झाला आहे, असा संशय आहे. त्यामुळे बँकेचे आर्थिक व्यवहार थांबविण्यात आले असावेत. बँकेने त्वरित रीत खातेधारकांच्या समस्या सोडवाव्यात.- गणेश जमादार, खातेधारकाचे नातेवाईकपीएमसी बँकेतले पैसे खातेधारकांना कमी दिले जाणार, याची सूचना बँकेने आधी द्यायला पाहिजे होती. ती सूचना न देता घाईघाईने बँकेने निर्णय घेतल्यामुळे खातेधारकांचे मोठे नुकसान होणार आहे. एक हजार रुपयांत महिन्याचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न आहे.- साई धनावडे, खातेधारकआरबीआयने पाठविलेल्या नोटिसीमध्ये बँकांच्या कर्मचाºयांचे पगार, वीजबिल व इतर खर्च बँक करू शकते, असे नमूद केले आहे. म्हणजे आरबीआयसाठी बँक महत्त्वाची आहे की सामान्य खातेदारकांचे पैसे? - दत्ताराम सानप, खातेधारकपीएमसी बँकेत माझे नऊ लाख रुपये फिक्स डिपॉजिटमध्ये आहेत. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यंदा दिवाळीनंतर घरात लग्नकार्यदेखील आहे. खर्चासाठी लागणारे पैसे मी आणायचे कुठून?- विकास सोनकांबळे, खातेधारकमाझे व माझ्या मैत्रिणीचे या बँकेत जॉइंट खाते आहे. माझा पगारदेखील थेट खात्यात जमा होतो. बँकेवर आलेल्या निर्बंधामुळे माझे पैसे सुरक्षित राहतील का? याबद्दल मला शंका आहे.- रीना मकवाना, खातेधारकनालासोपाऱ्यात खातेदारांचा रास्ता रोकोवसई : व्यवहारात आर्थिक अनियमितता आढळून आल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी मोठे निर्बंध लादले आहेत. या गंभीर निर्णयामुळे बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. वसई तालुक्यातील नालासोपारा आणि विरार पूर्व येथील शाखेबाहेर मंगळवारी ग्राहकांची गर्दी झाली होती. सर्वच ग्राहक विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. बँकेच्या निर्णयामुळे आता ग्राहकांना महिना केवळ हजारच रुपये मिळण्याच्या धक्क्याने कोणी बँकेतच चक्कर येऊन पडले तर बºयाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. नालासोपाºयातील पीएमसी बँकेची सेंट्रल पार्क शाखा बंद झाल्याचे कळल्यावर ग्राहकांनी गर्दी केली. येथे उपस्थित असलेल्या ३ खातेधारकांच्या खात्यात मोठी रक्कम होती. ती मिळणार नसल्याचा धसका घेतल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला.ठाणे जिल्ह्यातही ‘पीएमसी’च्या शाखांमध्ये गर्दीठाणे/डोंबिवली : रिझर्व्ह बँकेने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) वर घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरातील ठेवीदारही कमालीचे संतप्त झाले आहेत. बँकेच्या शाखा-शाखांमध्ये ठेवीदारांनी मंगळवारी गर्दी केल्यानंतर, तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाण्यातील खातेदारांनी कोट्यवधींच्या ठेवी या बँकेत ठेवल्या आहेत. या बँकेवरील निर्बंधांचे वृत्त समजताच शाखांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेल्या खातेदारांची समजूत काढताना बँक कर्मचाºयांशी शाब्दिक वाद झाल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. उल्हासनगरच्या शाखेत प्रचंड गर्दीमुळे दोन महिला बेशुद्ध झाल्या. या वेळी त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले.नवी मुंबईतील ग्राहकांमध्ये संतापनवी मुंबई : पीएमसी बँकेवरील आरबीआयने घातलेल्या निर्बंधांची माहिती मिळताच बँकेच्या खातेधारकांनी मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने बँकेबाहेर गर्दी केली होती. यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बँकेच्या सर्वच शाखेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.आरबीआयच्या निर्बंधांबाबत बँकेकडूनच खातेधारकांना मॅसेजद्वारे त्याची माहिती देण्यात आली. यामुळे शहरातील पीएमसी बँकेच्या प्रत्येक शाखेबाहेर खातेधारकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामध्ये महिला, पुरुषांसह वृद्धांचाही समावेश होता. अचानकपणे लाखो रुपये बँकेत अडकून पडल्याने त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी काहींनी तर एक दिवस अगोदरच मोठ्या रकमेच्या ठेवी बँकेत जमा केल्या होत्या. यामुळे ही रक्कम परत मिळणार की नाही याबाबत त्यांच्यात संभ्रम होता. यामुळे त्यांनी बँकेच्या कर्मचाºयांना धारेवर धरुन आपला रोष व्यक्त केला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी सर्वच शाखांबाहेर बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :पीएमसी बँक