Join us

आत्म्याने सांगितले म्हणून केला पत्नीचा गर्भपात; उच्च न्यायालयाच्या वकिलाला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:35 IST

दोघेही उच्च न्यायालयात वकील. पाच महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांतच पतीला आत्म्याशी बोलण्याचे वेड असल्याचे पत्नीच्या लक्षात आले आणि तिला धक्काच बसला.

मुंबई : दोघेही उच्च न्यायालयात वकील. पाच महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांतच पतीला आत्म्याशी बोलण्याचे वेड असल्याचे पत्नीच्या लक्षात आले आणि तिला धक्काच बसला. याच वेडातून त्याने ११ आठवड्यांची गर्भवती राहिलेल्या पत्नीकडे गर्भपातासाठी तगादा लावला. ‘आत्म्यांना हे बाळ नको आहे. हे बाळ आपले आयुष्य उद्ध्वस्त करेल,’ असे तो बोलू लागला. पत्नीने गर्भपातास नकार देताच, तिला मारहाण करून तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा वकील करण सिंग रजपूत (३४) याला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.मूळची दिल्लीची रहिवासी असलेल्या नेहाने (नावात बदल) वकिलीचे शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान तिचे रजपूतसोबत प्रेमसंबंध जुळले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघेही उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करू लागले. पाच महिन्यांपूर्वी दोघांनी घरच्यांच्या संमतीने विवाह केला. लग्नानंतर नेहा रजपूतसोबत कुलाबा येथील घरी राहण्यास आली. यामध्ये नेहा ११ आठवड्यांची गर्भवती राहिली. लग्नाच्या काही दिवसांतच पतीने सांगितले, ‘मला आत्म्यांनी सांगितले की, बाळाला जन्म दिला, तर आयुष्य उद्ध्वस्त होईल.’ त्यामुळे त्याने नेहाला गर्भपात करण्यास सांगितले. याने नेहा आणखीनच घाबरली. तिने गर्भपात करण्यास नकार दिला. याच रागातून गेल्या आठवड्यात त्याने नेहाला बेदम मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता, तिचा गर्भपात झाल्याचे समजले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेची माहिती मिळताच, नेहाच्या कुटुंबीयांनी नेहाकडे धाव घेतली. नेहाने या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात रजपूतविरुद्ध तक्रार दिली आणि कुटुंबीयांसोबत ती दिल्लीला निघून गेली. याच तक्रार अर्जावरून तपास करत असलेल्या कुलाबा पोलिसांनी मंगळवारी रजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली.

टॅग्स :अटक