Join us
Daily Top 2Weekly Top 5

भावाला वाचविताना अपघाती मृत्यू

By admin | Updated: September 29, 2015 01:38 IST

तीन वर्षीय भावाला वाचविताना ७ वर्षीय चिमुरडीने जीव गमावल्याची मन हेलावणारी घटना घाटकोपर येथे रविवारी घडली. यामुळे गणेश विसर्जसाठी निघालेल्या फाले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे

मनीषा म्हात्रे, मुंबईतीन वर्षीय भावाला वाचविताना ७ वर्षीय चिमुरडीने जीव गमावल्याची मन हेलावणारी घटना घाटकोपर येथे रविवारी घडली. यामुळे गणेश विसर्जसाठी निघालेल्या फाले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तनुष्का फाले असे मृत चिमुरडीचे नाव आहे. घाटकोपर पश्चिमेकडील गंगावाडी सोसायटीमध्ये राहणारे फाले कुटुंबीय. तनुष्का आई, बाबा आणि ३ वर्षीय भाऊ प्रथमेशसोबत येथे राहते. नवसाची असल्याने तनुष्का सर्वांचीच लाडाची. दहा दिवस बाप्पाची पूजा करून रविवारी पाचच्या सुमारास हे कुटुंबीय बाप्पाची मूर्ती घेऊन विसर्जनासाठी आनंदाने निघाले. बाप्पाचा जयघोष सुरू असताना भरधाव वेगाने येत असलेल्या स्कॉर्पियोच्या दिशेने प्रथमेश जात असल्याचे तनुष्काने पाहिले. त्याच्या बचावासाठी तिने त्याला आतल्या बाजूने ओढले. भाऊ वाचला मात्र तोपर्यंत ती गाडीच्या चाकाखाली चिरडली गेली. त्यानंतर एखाद्या किड्या-मुंग्याप्रमाणे स्कॉर्पियो चालकाने वाटेत आलेल्या ६५ वर्षीय महिलेसह दोघांना उडविले. मुलीच्या चिरडल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी तिला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.यात तनुष्कासह ६५ वर्षीय कलावती पाषाणकर यांचा मृत्यू झाला. १७ वर्षीय पूजा आणि वृद्ध दामोदर सावंत गंभीर जखमी असून राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक विलास क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)------------‘तो’ आरोपी शिक्षक सेनेचा पदाधिकारीविलास क्षीरसागर असे आरोपीचे नाव असून तो शिक्षक आहे. पालिकेच्या शिक्षण सेनेच्या स्कॉर्पियोतून हा अपघात झाल्याने तो शिक्षण सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.पार्किंग केलेली स्कॉर्पियो बाहेर काढत असताना ब्रेक दाबण्याऐवजी एस्कलेटरवर पाय पडल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.---------मोदकाचा प्रसाद अखेरचा ठरलासर्वांच्या लाडाची असलेल्या तनुष्काने बाप्पांच्या विसर्जनाला निघण्यापूर्वी सर्वांना मोदकाचा प्रसाद दिला. तिच्यामुळे परिसरात खेळीमेळीचे वातावरण असायचे. अशात तिने दिलेला प्रसाद अखेरचा असेल, असे स्वप्नातसुद्धा वाटले नसल्याचे शेजारी अपेक्षा चव्हाण हिने सांगितले.