मुंबई : गुरुवारी सकाळी शीव रेल्वे स्थानकावर लोकलमधून तीन विद्यार्थी पडले़ यामधील दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिषेक शर्मा (धारावी, १६), आनंद सिंग (घाटकोपर, १७), फुलचंद यादव (चुनाभट्टी, १६) आणि अर्जुन आहुजा (कुर्ला, १६) हे चौघेही येथील व्ही.व्ही.के. शर्मा महाविद्यालयात अकारावीत शिकत आहेत.गुरुवारी सकाळी त्यांची परीक्षा असल्याने या सर्वांनी महाविद्यालयात एकत्र जाण्याचे ठरविले. त्यांनी सीएसएमटीला जाणारी धिमी लोकल पकडली. ही लोकल शीव रेल्वे स्थानकात आली. शीव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वरील रुळाला ८:४५ च्या सुमारास तडे गेले. त्यामुळे धिम्या लोकल फलाट क्रमांक ४ वर वळविण्यात आल्या होत्या. फलाट क्रमांक ४ वर थांबलेल्या प्रवाशांनी ८:५५ ला आलेल्या लोकलमध्ये गर्दी केली. या चारही विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील बॅग्ज्ना शीव रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या भिंतीची धडक बसली. क्षणार्धातच यामधील तिघांचा तोल सुटला व ते नाल्यात पडले. अर्जुनला दरवाजामधील खांबाची व्यवस्थित पकड मिळाल्याने तो पडला नाही.
रेल्वे स्थानकात तीन विद्यार्थ्यांना अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 02:16 IST