वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुका झाल्या की लगेचच प्रभाग समिती आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत. ५ प्रभाग समिती सभापती आणि ९ स्वीकृत सदस्यांची निवडणूक जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.यंदा प्रभागाची लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभाग समित्यांची संख्याही वाढतील असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु प्रभाग समिती पूर्वीप्रमाणेच ५ राहणार आहेत. एका प्रभाग समितीअंतर्गत २३ नगरसेवकांचे क्षेत्र अंतर्भूत असेल. गेल्यावेळी स्वीकृत सदस्यांची संख्या ५ होती. यंदा ती ४ ने वाढून ९ झाली आहे. उमेदवारी देताना बहुजन विकास आघाडीने सोशल इंजिनिअरींगचा चांगला वापर केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधीत्व दिल्याने आघाडीला बऱ्यापैकी यशही मिळाले. प्रभाग समिती सभापती तसेच स्वीकृत सदस्य निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. प्रभाग समिती सभापतीपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. यंदा ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली नाही अशांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात येईल, असा अंदाज आहे. याबाबत लवकरच आ. हितेंद्र ठाकूर आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी याविषयी चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)
स्वीकृत सदस्यांची निवडणूक जुलैत
By admin | Updated: June 23, 2015 23:30 IST