Join us

सुटीच्या दिवशीही संमतीपत्रे स्वीकारणार

By admin | Updated: September 27, 2014 03:12 IST

विमानतळ प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा होत असलेला विरोध आता पूर्णत: मावळला आहे

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा होत असलेला विरोध आता पूर्णत: मावळला आहे. त्यामुळे संमतीपत्रे देण्यासाठी प्रकल्पग्रस्त स्वत:हून पुढे येत आहेत. प्रकल्पग्रस्तांचा वाढता प्रतिसाद पाहून सुटीच्या दिवशीही संमतीपत्रे स्वीकारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना सिडकोने आकर्षक पुनर्वसन पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पॅकेज समाधानकारक नसल्याची तक्रार करीत काही प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने सिडकोचे पॅकेज सर्वोत्तम असल्याचा निर्वाळा देत ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी केंद्रीय कायद्यानुसार मोबदला स्वीकारावा, असे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संमतीपत्रे न देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पनवेल येथील सिडकोच्या मेट्रो सेंटरमध्ये संमतीपत्रे देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची रीघ लागली आहे. संमतीपत्रे सादर करण्यासाठी न्यायालयाने ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुटीच्या दिवशीही संमतीपत्रे स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती भूमी व भूसंपादन अधिकारी रेवती गायकर यांनी दिली (प्रतिनिधी)