Join us

हार्बर रेल्वे मार्गावरूनही धावणार एसी लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:06 IST

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान आता एसी लोकल धावणार आहे. मध्य ...

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान आता एसी लोकल धावणार आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव तयार केला आहे. तो रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दर दिवशी १० फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. याआधी सुरू झालेल्या सीएसएमटी ते कल्याण आणि ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलला कमी प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पनवेल ते सीएसएमटी या एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

आधी पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल धावली. त्यानंतर पाठोपाठ मध्य रेल्वेवरही वातानुकूलित लोकल धावू लागली होती. मध्य रेल्वेने वातानुकूलित गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर रेल्वेसेवा बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लोकल रेल्वे पुन्हा रुळावर आली. त्यानंतर पुन्हा एससी लोकल सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर एसी लोकल सुरू आहे. सामान्य लोकलमध्ये बदल करत त्याचे वातानुकूलित गाडीत रूपांतर करून ती चालविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने सीएमएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान १० एसी लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या. एसी लोकलची सेवा सोमवार ते शनिवारी सुरू करण्यात आली. सर्वच स्थानकांवर या लोकलला थांबे देण्यात आले. आता हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयाने यासंदर्भातील प्रस्ताव पंधरा दिवसांपूर्वीच मुख्यालयाकडे पाठविला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती विभागीय रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर वातानुकूलित लोकल चालवताना त्याच्या दरदिवशी १० फेऱ्या होतील, असेही सांगितले.