Join us  

मध्य रेल्वेचा प्रवासही होणार गारेगार; कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:54 AM

दुसरी एसी लोकल मार्च महिन्यापर्यंत येईल तर उर्वरित लोकल डिसेंबर २०२० पर्यंत ताफ्यात येतील

मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल झाली असून या मार्गावर जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही लोकल धावेल, अशी शक्यता आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर एसी लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाच्या सुविधेसाठी आणखी पाच एसी लोकल येणार आहेत, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोेयल यांनी ही माहिती दिली.

दुसरी एसी लोकल मार्च महिन्यापर्यंत येईल तर उर्वरित लोकल डिसेंबर २०२० पर्यंत ताफ्यात येतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले. पहिली एसी लोकल नेमकी कोणत्या मार्गावर चालविण्यात येईल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रवासी संघटनांशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून एसी लोकलच्या दिवसभरात १० ते १२ फेऱ्या चालविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. प्रवाशांना आणीबाणीच्या प्रसंगी मोटरमनशी संवाद साधण्यासाठी टॉकबॅकची सुविधा देण्यात आली आहे. या लोकलचे दरवाजे स्वयंचलित असून दरवाजे बंद झाल्यानंतर मोटरमन व गार्डला संदेश मिळेल व त्यानंतरच लोकल सुरू होईल.

एसी लोकलमध्ये स्टेनलेस स्टीलची आसने बसविण्यात आली असून, पॅनोरोमिक दर्शन देणाºया मोठ्या खिडक्या आहेत. त्यासाठी डबल शिल्ड काच वापरण्यात आली आहे. एसी लोकलसाठी १०० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सामान ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमच्या फ्रेममध्ये पारदर्शक काच बसवण्यात आली आहे. या लोकलचे दर हे पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणाºया एसी लोकलप्रमाणे प्रथम दर्जाच्या १.३ पट असतील, असे सुतार यांनी स्पष्ट केले.

अशी आहेत मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलची वैशिष्ट्ये

  • लोकलमध्ये १,०२८ आसनांची क्षमता आहे तर ५,९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील.
  • स्टेनलेस स्टीलची आसने आहेत.
  • प्रवाशांना आणीबाणीच्या प्रसंगी मोटरमनशी संवाद साधण्यासाठी टॉकबॅकची सुविधा आहे.
  • लोकलचे दरवाजे स्वयंचलित असून दरवाजे बंद झाल्यानंतर मोटरमन व गार्डला संदेश मिळेल व त्यानंतरच लोकल सुरू होईल.
  • मेक इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या या लोकलच्या निर्मितीसाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
  • यामधील विद्युत यंत्रणेचे काम भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड (भेल)ने केले आहे.
  • चेन्नईतील इंट्रिगल कोच फॅक्टरी (आयसीएफ)मध्ये त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
  • महिला करणार सारथ्य

मध्य रेल्वेच्या या एसी लोकलचे सारथ्य महिला मोटरमन करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

टॅग्स :मध्य रेल्वेभारतीय रेल्वेएसी लोकल