Join us

एसी लोकल जलद मार्गावर

By admin | Updated: August 5, 2015 01:57 IST

एसी लोकल (वातानुकूलित) येत्या आॅक्टोबर महिन्यात दाखल होणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून सांगण्यात आल्यानंतर ही लोकल चर्चगेट ते बोरीवली जलद मार्गावर

मुंबई : एसी लोकल (वातानुकूलित) येत्या आॅक्टोबर महिन्यात दाखल होणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून सांगण्यात आल्यानंतर ही लोकल चर्चगेट ते बोरीवली जलद मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.मुंबईत येणाऱ्या नव्या एमयूटीपी-२मधील बम्बार्डियर लोकलची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) करण्यात येत असून, तेथेच मुंबईत येणाऱ्या एसी (वातानुकूलित) लोकलचीही बांधणी करण्यात येत आहे. अशा बारा एसी लोकल बनवण्याचे काम रेल्वे बोर्डाने आयसीएफला दिले आहे. यापैकी एक लोकल येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत दाखल होणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आधीच सांगितले आहे. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही लोकल नक्की कधी दाखल होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मात्र ही लोकल चर्चगेट ते बोरीवली अशी जलद मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलद मार्गावर चालवतानाही या लोकलला सुरुवातीला कमी थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेटहून लोकल सुटल्यानंतर दादर, वांद्रा, अंधेरी आणि बोरीवली स्थानकात थांबेल. या लोकलला मुंबई सेंट्रल आणि अंधेरी ते बोरीवलीदरम्यान आणखी एका स्थानकावर थांबा देण्याचा विचार करण्यात येत आहे.