Join us

एसी डबल डेकर आता ‘रातराणी’स्पेशल?

By admin | Updated: April 17, 2015 01:36 IST

कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या एसी डबल डेकर ट्रेनचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. ही ट्रेन बंद न केल्याचे सांगत नवीन पर्याय शोधत असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबई : कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या एसी डबल डेकर ट्रेनचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. ही ट्रेन बंद न केल्याचे सांगत नवीन पर्याय शोधत असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. एसी डबल डेकर आता ‘रातराणी’ म्हणून चालवण्याचा विचार केला जात आहे. मात्र त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंकाही रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. २0१४मध्ये गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र वाढत्या तिकीटदरामुळे तिला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ही ट्रेन कोकणवासीयांसाठी नॉन प्रिमियम म्हणून दिवाळीत चालवण्यात आली. मात्र त्या वेळी गर्दीच नसल्याने ती रिकामीच धावली. त्यानंतर एसी डबल डेकरला पुन्हा चालवण्याचा मुहूर्त न देता मध्य रेल्वेने ती देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर सायडिंगलाच ठेवली. ट्रेनला प्रतिसाद मिळत नसल्याने ११ डब्यांच्या या ट्रेनचे डबे दक्षिण रेल्वेला देण्याचा विचारही सुरू झाला आणि यातील दोन डबे दक्षिण विभागाला तात्पुरते देऊनही टाकले. यानंतर ही ट्रेन अद्यापही देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली वसई येथील यार्डातच उभी आहे. लोअर परेल येथील वर्कशॉपमध्ये जागा नसल्यानेच तेथे उभी करण्यात आल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. त्यामुळे ही ट्रेन पुन्हा धावणार की नाही, असा प्रश्न उभा राहिला असून, याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक राजीव दत्त शर्मा यांना सांगितले की, ही ट्रेन धावेल. मात्र त्यासाठी नव्या पर्यायांचाही विचार केला जात आहे. ट्रेन रात्री किंवा मध्यरात्री सोडण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळेल, असाही प्रश्न आम्हाला आहे. (प्रतिनिधी)पुन्हा गणेशोत्सवातील मुहूर्तएसी डबल डेकर ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. मात्र ही ट्रेन देखभाल आणि दुरुस्तीसाठी कार्यशाळेत गेल्यास साधारपणे एक ते दोन महिने बाहेर येण्यासाठी लागतील. तोपर्यंत पावसाळा सुरू होत असून, ती त्या काळात धावणे अशक्यच आहे. त्यामुळे पुन्हा गणपतीचाच मुहूर्त या ट्रेनला देण्यात येतो की काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.एसी डबल डेकर सुरू झाल्यावर ती एलटीटी ते करमाळी अशी धावली. एलटीटी येथून सकाळी साडे पाच वाजता सुटून करमाळी येथे त्याच दिवशी १६.३0 वाजता पोहोचत होती. तर करमाळी येथून सकाळी ६ वाजता सुटून त्याच दिवशी १७.४0 वाजता एलटीटी येथे पोहोचत होती. या ट्रेनच्या गणेशोत्सव काळात २0 फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. तर दिवाळीत १६ फेऱ्या सोडण्यात आल्यानंतर नॉन मान्सून म्हणून आणखी १२ फेऱ्याही सोडल्या. त्या वेळीही तीच वेळ या ट्रेनची होती