Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सुमारे दहा लाख लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST

मुंबई : मुंबईत सातत्याने लसींच्या साठ्याचा अभाव जाणवत असल्याने लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे, तर दुसरीकडे यामुळेच दुसऱ्या डोससाठी ...

मुंबई : मुंबईत सातत्याने लसींच्या साठ्याचा अभाव जाणवत असल्याने लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे, तर दुसरीकडे यामुळेच दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यात जवळपास २७ लाख लाभार्थी, तर मुंबईत जवळपास दहा लाख लाभार्थी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात कोविशिल्ड लस घेतलेले १९ लाख लाभार्थी प्रतीक्षेत आहेत, तर कोव्हॅक्सिन घेतलेले आठ लाख लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, लसींच्या मिळणाऱ्या साठ्यात दुसऱ्या डोस देणाऱ्या लाभार्थींना प्राधान्य दिले जाते.

तर पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यासाठी दिलेली मुदत संपली तरी त्यानंतर दोन आठवड्यांची मुदत उपलब्ध असते. विलंब झाला तरी दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे असल्याची माहिती कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.

दुसऱ्या डोससाठीची मुदत

कोविशिल्ड ८४ दिवस

कोव्हॅक्सिन २८दिवस

जिल्ह्यात झालेले लसीकरण पहिला डोस – ६८,१५,८०८

दुसरा डोस – २४,८९,८५४

दुसरा डोसही तितकाच आवश्यक

लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात विषाणुरोधी प्रतिकार शक्ती निर्माण होते. पहिल्या डोसमुळे निर्माण झालेली ही प्रतिकार शक्ती कालांतराने क्षीण होत जाते. लसीचा दुसरा डोस क्षीण होत चाललेल्या या प्रतिकार शक्तीला पुन्हा तेजी देतो आणि शरीरात पुन्हा जोमाने विषाणुरोधी प्रतिकार शक्ती निर्माण होते. कोरोनाच्या डेल्टासारख्या व्हेरिएंटपासून संरक्षण हवे असेल तर लसीचे दोन्ही डोस गरजेचे आहेत.

अडचण काय?

लसींच्या साठ्यात तुटवडा जाणवत असल्याने बरेचदा लसीकरणात खंड येतो. परिणामी, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या पदरी निराशा येत असल्याचे दिसून येत आहे.